पुणे : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेच्या माध्यमातून शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे तातडीने सुरू करण्याबरोबरच मलवाहिन्यांच्या कामांना गती देण्याची सूचना राष्ट्रीय नदीसंवर्धन संचालनालयाचे (एनआरसीडी) सहसचिव झैगम अली खान यांनी महापालिका प्रशासनाला केली.

खान यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेत बैठक घेण्यात आली. बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आदी उपस्थित होते.

‘शहरात तयार होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केवळ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारून उपयोग नाही, तर या केंद्रांपर्यंत मैलापाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक मलवाहिन्यांचे जाळेदेखील वेळेत विकसित करणे आवश्यक आहे. त्यामुळे शुद्धीकरण केंद्रांच्या कामाबरोबरच मलवाहिन्यांची कामेही पूर्ण करावीत,’ असे खान म्हणाले.

‘या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी चार केंद्रे सध्या सुरू झाली असून, पाच केंद्रे डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. या पाच केंद्रांची एकत्रित क्षमता २९० एमएलडी आहे,’ अशी माहिती महापालिका आयुक्त राम यांनी दिली.

ते म्हणाले, ‘या प्रकल्पांतर्गत तानाजीवाडी येथे १५ एमएलडी क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू असून, हे काम सप्टेंबर २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच, बोटॅनिकल गार्डन येथे १० एमएलडी क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे.

या केंद्रासाठी आवश्यक जागेसंदर्भात नुकतेच ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे या केंद्राच्या कामाला आता मार्ग मोकळा झाला असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या प्रकल्पामुळे पुणे शहरातील उपलब्ध मैलापाणी प्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, पुण्यात दररोज सुमारे ९८० एमएलडी सांडपाणी निर्माण होत असताना २०२५ मध्ये उपलब्ध प्रक्रिया क्षमता केवळ ४७७ एमएलडी होती. त्यामुळे नदी प्रदूषणाचे मूळ कारण पूर्णपणे दूर करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे, २०२५ च्या अखेरीस केंद्र सरकारने या प्रकल्पाची भौतिक प्रगती सुमारे ६५ टक्के असल्याचे संसदेत सांगितले होते. मार्च २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते.

अशी आहेत प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये..

  • एकूण मंजूर खर्च : ९९०.२६ कोटी
  • केंद्राचा हिस्सा : ८४१.७२ कोटी
  • नवीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे : ११
  • अतिरिक्त शुद्धीकरण क्षमता : ३६९ एमएलडी
  • विद्यमान पंपिंग यंत्रणांचे नूतनीकरण हा देखील प्रकल्पाचा भाग आहे.