पिंपरी : नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती ताब्यात घेत ती ‘म्यूल अकाउंट’ म्हणून सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी वापरणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. गोव्यातील नागरिकांकडून, विशेषतः महिलांकडून ७० बँक खाती मिळवून त्यातून सायबर फसवणुकीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी गोवा आणि कोलकाता येथील दोघांना अटक केली आहे.

अभिकेष मोहन आचरेकर (वय ३४, रा. गोवा) आणि अनमोल शर्मा (वय ३२, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकाला विदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास ५०० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यातून त्यांची ८३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात फिर्यादीकडून ३० लाख रुपये एका बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे पोलिसांना आढळले. हे खाते अभिकेष आणि एका महिलेच्या भागीदारीतील असल्याचे निष्पन्न झाले. अभिकेष वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. मात्र, तांत्रिक विश्लेषणातून तो पुण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने खेड शिवापूर येथे त्याला ताब्यात घेतले.

महिलांना कर्जाचे आमिष

चौकशीत अभिकेष हा साथीदारांच्या मदतीने गोव्यातील सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती मिळवत असल्याचे समोर आले. अशा प्रकारे ७० खाती मिळवून ती अनमोल शर्मा व इतर साथीदारांमार्फत सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी वापरल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून, आर्थिक आणि तांत्रिक तपास सुरू आहे.

कोलकात्यातून शर्मा अटकेत

अभिकेषकडून मिळालेल्या माहितीनंतर अनमोल शर्माचा तांत्रिक माग काढण्यात आला. तो कोलकाता येथे असल्याचे समजल्यानंतर सायबर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. अभिकेषकडून विविध बँक खाती घेऊन त्यांचा सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी वापर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बँक खाते इतरांना वापरण्यास देऊ नका

कर्ज, कमिशन किंवा नोकरीचे आमिष दाखवून कोणाला बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, नेट बँकिंग अथवा यूपीआयचा ताबा देणे धोकादायक ठरू शकते. अशा खात्याचा सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी वापर झाल्यास खातेधारकही तपासाच्या कक्षेत येऊ शकतो. त्यामुळे आर्थिक फायद्याच्या बदल्यात स्वतःचे बँक खाते इतरांना वापरण्यास देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.