पुणे : धावत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील स्वामी नारायण मंदिरासमोर घडली. मोटारतालकासह तिघे जण प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मोटारीने पेट घेतल्यानंतर काही काळ बाह्यवळण मार्गावरील विस्कळीत झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

अग्निशन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता भागातील रहिवासी शिवाजी तोडकर हे दोन मित्रांसह पाचगणीला गेले होते. तेथून ते मोटारीतून बाह्यवळण मार्गाने सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घरी परतत होते. नऱ्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिरासमोर अचानक मोटारीने पेट घेतला. मोटारीने पेट घेतल्यानंतर तोडकर आणि त्यांच्या बरोबर असलेले दोन मित्र प्रसंगावधान राखून मोटारीतून बाहेर पडले. त्यानंतर काही क्षणात भडका उडाला आणि मोटार पूर्णपणे जळाली.

या घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिसांचे पथक, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला. मोटार पूर्णपणे जळाली होती. मोटारीने पेट घेतल्यानंतर बाह्यळण मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट उडाली. पोलिसांनी जळालेली मोटार क्रेनचा वापर करुन हटवली. या घटनेनंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मोटार बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती नऱ्हे पोलिसांनी दिली.