पुणे : करोना संकटानंतर देशातील महानगरांमध्ये मोठ्या घरांना वाढलेली मागणी कायम आहे. महानगरांमध्ये घरांच्या आकारमानात गेल्या दोन वर्षांत सरासरी १७ टक्के वाढ नोंदविण्यात आली. इतर महानगरांच्या तुलनेत पुण्यात ही वाढ कमी असून, ती केवळ ५ टक्के आहे, तर दिल्लीत ही वाढ सर्वाधिक ३० टक्के आहे.
‘अनारॉक ग्रुप’ने देशातील महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, महानगरांमध्ये २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत घरांच्या आकारमानात सरासरी १७ टक्के वाढ झाली आहे. देशात घरांचे सरासरी आकारमान २०२३ मध्ये १ हजार ४२० चौरस फूट होते, ते २०२५ मध्ये वाढून १ हजार ६५६ चौरस फुटांवर पोहोचले. पुण्यात मात्र दोन वर्षांतील ही सरासरी वाढ ५ टक्के आहे. त्यात केवळ गेल्या वर्षीचा विचार करता घरांच्या आकारमानात एक टक्का घट नोंदविण्यात आली आहे. पुण्यात घरांचे आकारमान २०२३ मध्ये १ हजार ७० चौरस फूट होते. ते २०२५ मध्ये १ हजार ११९ चौरस फुटांवर गेले. याच वेळी मुंबईत घरांच्या आकारमानात दोन वर्षांत १२ टक्के वाढ झाली आहे. तिथे घरांचे आकारमान २०२३ मध्ये ८१० चौरस फूट होते, ते २०२५ मध्ये ९०४ चौरस फुटांवर गेले.
देशात दिल्लीत घरांच्या आकारमानात सर्वाधिक ३० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दिल्लीत घरांचे आकारमान दोन वर्षांत १ हजार ८९० वरून २ हजार ४६६ चौरस फूट झाले. त्या खालोखाल चेन्नईमध्ये ही वाढ २४ टक्के आहे. तिथे घरांचे आकारमान दोन वर्षांत १ हजार २६० वरून १ हजार ५६१ चौरस फूट झाले आहे. बंगळुरूत ही वाढ २१ टक्के असून, घरांचे आकारमान १ हजार ४८४ वरून १ हजार ७९० चौरस फूट झाले आहे. हैदराबादमध्ये ही वाढ १३ टक्के असून, घरांचे आकारमान २ हजार २९९ चौरस फुटांवरून २ हजार ६०० चौरस फुटांवर पोहोचले. कोलकात्यात घरांच्या आकारमानातील वाढ फक्त २ टक्के असून, तिथे घरांचे आकारमान १ हजार १२४ वरून १ हजार १५१ चौरस फूट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
करोना संकटानंतर मोठ्या घरांना मागणी वाढत आहे. ग्राहकांची पसंती असल्याने विकासकांकडूनही अशा प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे घरांच्या आकारमानात सातत्याने वाढ होताना दिसते. देशातील महानगरांमध्ये २ बीएचके आणि ३ बीएचके घरांची विक्री वाढत आहे. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप
देशातील घरांचे सरासरी आकारमान
| वर्ष | आकारमान (प्रतिचौरस फूट) |
| २०१९ | १,१४० |
| २०२३ | १,४२० |
| २०२५ | १,६५६ |
