पुणे : पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर औद्योगिक पट्टा विकसित करण्याचे पहिले पाऊल आता पडले आहे. द्रुतगती मार्गाभोवती मावळ तालुक्यात नवीन ‘एमआयडीसी’ उभारण्यात येणार आहे. बऊरसह तीन गावांमध्ये या ‘एमआयडीसी’साठी सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण झाली आहे. आता भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी या तीन गावांच्या परिसरात सुमारे ११०० एकरांवर ‘एमआयडीसी’ उभारली जाईल. विशेष म्हणजे द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना ‘एमआयडीसी’ असेल. द्रुतगती मार्गाभोवतीच्या कोरडवाहू जमिनीची यासाठी निवड करण्यात आली आहे. उद्योग विभागाने २००७ मध्ये बऊर ‘एमआयडीसी’ची जागा अधिसूचित केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये या परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्रीस मनाई करण्याची सूचना काढण्यात आली. या ‘एमआयडीसी’साठी जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण झाली आहे. आता भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.
‘एमआयडीसी’कडून भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात २२ मे रोजी बऊर एमआयडीसी क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जमिनीच्या दरनिश्चितीबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. मात्र, अंतिम निर्णय झाला नसून, लवकरच पुढील बैठक होणार आहे. या बैठकीला मावळचे आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बऊर एमआयडीसी
एकूण क्षेत्र – ११०० एकर
बऊर, करंज – ५०० एकर
ब्राह्मणवाडी – ६०० एकर
एकरी प्राथमिक किंमत – ८४ लाख रुपये
शेतजमीन मालक – ४०० ते ५००
भूसंपादन स्थिती – दरनिश्चितीच्या टप्प्यावर
बऊर ‘एमआयडीसी’साठी जागेचे सर्वेक्षण आणि मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर याबाबत संयुक्त बैठकही झाली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.- संतोष भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एमआयडीसी’
बऊर येथील प्रस्तावित ‘एमआयडीसी’मुळे या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. यामुळे गुंतवणूक आकर्षित होणार असून, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर स्थानिक पुरवठा साखळी आणखी बळकट होणार आहे. या ‘एमआयडीसी’ची उभारणी करताना पायाभूत सुविधांचीही उभारणी करण्याची आवश्यकता आहे.- अनू सेठी, अध्यक्ष, तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशन
