पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील (एक्सप्रेस-वे) खोपोली-खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू असले, तरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) अद्याप पूर्ण करता आलेले नाही. या दिरंगाईमुळेच महामार्गावरील नागरिकांना सुमारे ३२ तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले असून, याची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांवर निश्चित करून चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रासायनिक वायूचा टँकर आडोशी बोगद्याजवळ (बोरघाट) उलटल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी वाहतूक सुमारे ३२ तासांनंतर खुली करण्यात आली. मात्र, ज्या वाहतूककोंडीतून दिलासा मिळण्यासाठी या महामार्गावर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प साकारण्यात येत आहे, त्या प्रकल्पाचे काम कासव गतीनेच सुरू असल्यानेच वाहनचालकांना फटका बसला असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.
वेलणकर म्हणाले, ‘एमएसआरडीसीने मार्च २०१९ मध्येच १३.३ किलोमीटर लांबीचा, दोन बोगदे आणि दोन प्रमुख पूल असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेतला. नियोजनानुसार २०२२ मध्येच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे विलंब झाला. त्यानंतर प्रकल्पाला दिरंगाई सुरू झाली, ते सात वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला, तरी अधिकाऱ्यांकडून तारखांवर तारखा दिल्या आहे. आता १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, दिलेल्या उद्दिष्टानुसार वेळेवर हा प्रकल्प साधला गेला असता, तर नागरिकांना तासन् तास वाहतूककोंडीत अडकावे लागले नसते.’
मिसिंग लिंक साकारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री उपलब्ध आहे. मात्र, याच सह्याद्रीच्या पर्वत रांगांतून ३० वर्षांपूर्वी ९० बोगदे आणि दोन हजार पूल असलेला ७४० किमी लांबीचा कोकण रेल्वे प्रकल्प केवळ आठ वर्षांत (१९९० ते १९९८) पूर्ण करण्यात आला, असा उपरोधिक टोला वेलणकर यांनी लगावला.
गेल्या सात वर्षांपासून मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून, आर्थिक नुकसान होत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापेक्षा अधिक आर्थिक नुकसान गेल्या दोन दिवसांत वाहतुकीत अडकून पडलेल्या नागरिकांचे झाले आहे. याला एमएसआरडीसीचे अधिकारी जबाबदार असून, त्यांची चौकशी करावी. – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

