पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग सुमारे ३२ तासांनंतर मोकळा झाला. मात्र, गुरुवारी दिवसभर वाहतूक संथ गतीने सुरू होती. रासायनिक टँकर उलटल्याने झालेल्या या दुर्घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तयार करण्यात आला आहे. आता दीर्घकालीन उपायोजनांसाठी स्वतंत्र अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
या महामार्गावर उलटलेल्या टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री दीड वाजता सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सुमारे ३२ तासानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र, दीर्घ काळापासून दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास विलंब लागला. त्यामुळे गुरुवारी दिवसभर वाहतूक मंद गतीने सुरू होती. त्यासाठी
‘या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. आपत्तीकाळातील उपाययोजना आणि दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी स्वतंत्र अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.’ असे ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी सांगितले.
‘एमएसआरडीसी’च्या प्राथमिक अहवालात काय?
टँकर अडोशी बोगद्याजवळ उलटल्यानंतर वायुची तीव्रता आणि गांभीर्यता लक्षात घेऊन महामार्गावरील नियंत्रण कक्षाद्वारे आपत्कालीन प्रतिसाद योजनेंतर्गत शीघ्र प्रतिसाद वाहने (क्विक रिस्पाॅन्स), रुग्णवाहिका, डेल्टा फोर्स, पेट्रोलिंग कर्मचारी, अग्निशामक दलाचे बंब, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) तुकडी, रायायनिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठविण्यात आले.
बुधवारी रात्री आठ वाजता अपघातग्रस्त टँकरमधील वायू सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थानांतरीत करण्यास सुरुवात करण्यात आली. त्याच वेळी पथकाकडून वायूगळती रोखण्यासाठीही प्रयत्न सुरू होते. रासायनिक तज्ज्ञांच्या पथकाकडून वायू स्थानांतर करण्याची प्रक्रिया सावकाश आणि सुरक्षितपणे सुरू होती. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब लागला. बुधवारी रात्री दीड वाजता वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रात्री पावणेदोन वाजता दोन्ही मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली, असे ‘एमएसआरडीसी’च्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
महामार्गावरील रासायनिक वायू घेऊन जाणाऱ्या टँकरमधील वायू रात्री दीड वाजता सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरला. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. संकटकाळातील उपाययोजना आणि दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी स्वतंत्र अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येईल.- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी
