Pune Mumbai Expressway Gridlock SOP’s Traffic Management: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपीलिन वायू भरलेला टँकर उलटला आणि हा मार्ग पुढे ३२ तासांहून अधिक काळ ठप्प झाला. गेल्या मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळपासून सुरू झालेली ही कोंडीची गोष्ट अजून संपलेली नाही. म्हणजे ३२ तासांनंतर वाहतूक पुढे सरकली, तरी तिची गती संथच राहिली आणि वाहतूक मधेमधे अडखळत राहिली, हे तर आहेच. मात्र, तितक्यावरही या घटनेचे कवित्व संपत नाही. या घटनेची चौकशी आणि अशी आपत्कालीन स्थिती भविष्यात घडली, तर कोंडी टाळण्यासाठी काय मार्ग असू शकतो, याचा आराखडा तयार करणे इथपर्यंत हा विषय येऊन ठेपला आहे.
SoP: ‘एसओपी’ची गरज
आता असा आराखडा तयार झाला किंवा राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात ‘एमएसआरडीसी’ म्हणते त्याप्रमाणे एकूणच कोंडी सोडविण्यासाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) तयार झाली, तर ते चांगलेच. प्रश्न उरतो, तो फक्त असा, की हे सगळे पुढची घटना घडायच्या आधी तयार होणार ना, हा. आपल्या यंत्रणांविषयी कायम हा प्रश्न पडतो, कारण यंत्रणांची मानसिकताच घटना घडल्यावर पावले उचलण्याची आहे. ती खरे तर घटना घडू नये म्हणून उपाय करण्याची आणि तरी एखादी घटना घडलीच, तर त्याला नेमकेपणाने सामोरे जायची तयारी असेपर्यंतचीही हवी. ती जोवर निर्माण होत नाही, तोवर महाकोंडीतून आपण काहीच शिकलो नाही, असेच म्हणावे लागेल.
कोंडी नित्याची का बनते?
द्रुतगती मार्गावरील कोंडी हा तसा नित्याचा विषय. या मार्गाला द्रुतगती मार्ग तरी का म्हणावे, इतका वेळ या मार्गावरून पुणे-मुंबई वा उलटा प्रवास करणाऱ्या अनेकांना लागत असतो. विशेषत: घाटामध्ये तर रात्रीच्या वेळी हमखास कोंडीचीच ‘हमी’ असते. या रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांनी सर्रास त्यांच्यासाठीची मार्गिका सोडून गाड्या चालवणे आणि प्रवासी गाड्यांनी बेशिस्तीचे नवनवे उच्चांक गाठणे अशी स्पर्धाही आता नवी नाही. या रस्त्यावरील प्रवासातील खंड हा प्रवाशांसाठी अत्यंत त्रासाचा असतोच; पण कामाचे अनेक मानवी तास वाया घालवून प्रचंड आर्थिक नुकसान करणाराही असतो. टँकर उलटून नुकतीच जी कोंडी झाली, त्याने केलेले नुकसान कोट्यवधींचे होते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
‘टँकर’ घटनेने काय दाखवले?
अर्थात, नुकत्याच घडलेल्या घटनेची दोन वेगवेगळ्या अंगांनी चर्चा करायला हवी, याचेही भान ठेवणे महत्त्वाचे. त्यातील पहिले अंग, द्रुतगती मार्गावर उलटलेला अत्यंत ज्वलनशील वायू भरलेला टँकर बाजूला करण्याची जोखीम एका यंत्रणेने उत्तम निभावली, हे आहे. प्रोपीलिन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने केवळ उलटलेला टँकर बाजूला करणे इतक्यापुरतीच ही कामगिरी मर्यादित नव्हती, तर तो वायू बाहेर पडू न देता दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षित स्थानांतरित करणे आणि मग टँकर रस्त्यातून हटविणे अशी ही अतिशय जोखमीची कामगिरी होती. थोडक्यात, हे एक प्रकारचे मोठे आपत्ती व्यवस्थापन कार्य होते. ते आपल्या यंत्रणांनी चोखपणे आणि सुरक्षितपणे पार पाडले. ‘तज्ज्ञांकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली गेली. त्यामुळे अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधोरेखित झाली. स्फोटक वायू असताना तातडीने उपाययोजना केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही, ही कौतुकास्पद बाब आहे,’ असे खुद्द राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अर्थात ‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले यांनी नमूद केले आहे.
यातून धडा काय?
याचाच अर्थ अशी काही आपत्ती आली, तर त्याला सामोरे जाणे शक्य आहे, हे एका यंत्रणेने दाखवले. एक यंत्रणा जर हे आव्हान पेलू शकते, तर त्यामुळे होणारा परिणाम – वाहतूक कोंडी – टाळण्यासाठी ठोस उपाययोजना का असू नये, असा खरा प्रश्न आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेतील टँकर ज्वलनशील होता, पण अन्य वेळी दुसरे एखादे अवजड वाहन उलटले वा अपघातग्रस्त झाले, तर त्यानेही कोंडी होते हा अनुभव का नवीन नाही. त्यावर उपाययोजना नाही, हे आपले अटळ वर्तमान आहे, ते बदलायला हवे.
प्रवाशांचे अनुभव बोलके
गेल्या ३ फेब्रुवारीच्या रात्री कोंडीत अडकलेल्या अनेकांचा अनुभव याबाबत बोलका आहे, तो समजून घ्यायला हवा. उद्योजक श्रीराम सोमण मंगळवारी संध्याकाळी पुण्याहून पनवेलला जायला निघाले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी पुण्याहून मुंबईकडे जातानाचा घाटातील पहिला बोगदा पार केला आणि ते वाहतूक कोंडीत अडकले. ऐन घाट मार्गावर वाहतूक कोंडीत अडकल्याने मोठी पंचाईत झाली. त्यांना अर्धा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल सहा तास इतका वेळ लागला. घाटामध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक वळवण्यात आल्यानंतर त्यांनी तेथून खोपोली आणि नंतर पनवेलपर्यंतचा प्रवास केला. सोमण यांनी यानिमित्ताने महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘अपघात झाल्यानंतर त्या अपघाताची माहिती अलीकडच्या टोलनाक्यावर लगेच पोहोचवली गेली असती आणि वाहतुकीचे नियोजन केले गेले असते, तर इतकी मोठी कोंडी कदाचित टळली असती. मात्र, ते झाल्याचे दिसले नाही. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत गेल्या.’
कोंडीची माहिती पोहोचविणारी यंत्रणाच नाही!
सॉफ्टवेअर अभियंता अंकुर मुंगी यांचा अनुभवही व्यवस्थेमधील त्रुटी दाखवणारा. अंकुर मुंगी मंगळवारी संध्याकाळी कार्यालयीन बैठक संपवून मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. साधारण साडेआठच्या सुमारास खालापूर येथून पुढे घाटाच्या थोडेसे अलीकडे त्यांना थांबावे लागले. मुंबईहून पुण्याला जाणारा मार्ग त्या वेळी बंद करण्यात आल्याने वाहने जागच्या जागी थांबून होती. ते म्हणाले, ‘पहिला तासभर काय झाले आहे, त्याचा पत्ता लागला नाही. नंतर काही वेळाने साधारण ११ च्या सुमारास पोलिसांच्या गाड्या पुणे-मुंबई मार्गिकेतून उलट्या दिशेने जाताना दिसल्या. नंतर मोबाइलवर बातम्या पाहिल्या असता, घाटात अपघात झाल्याचे समजले.’
प्रवाशांचे हाल
वाहने पुढे सरकत नसल्याने आणि बरीच रात्र झाल्याने मुंगी यांनी चालकाला थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले. आजूबाजूच्या वाहनांतील चालकही खाली उतरून परिस्थितीचा अंदाज घेत होते. त्या ठिकाणी पिण्याचे पाणी नसल्याने मात्र अनेकांची, विशेषतः महिला आणि लहान मुलांची गैरसोय झाली, असा अनुभव त्यांनी मांडला. मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक हळूहळू पुढे सरकू लागली. या मार्गातच समोरून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी एक मार्गिका खुली करून देण्यात आली. ‘एकदा वाहने हलायला सुरुवात झाल्यानंतर पुढे दोन तासांत मी पुण्यात पोहोचलो,’ असे मुंगी यांनी सांगितले.
चालकांमधील स्वयंशिस्तीचा अभाव
यानिमित्ताने मुंगी यांनी एक निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, ‘द्रुतगती मार्गांवर अनेकदा अवजड वाहनांचा अडथळा निर्माण होतो. अवजड वाहनांच्या चालकांना द्रुतगती मार्गावरून वाहन चालवण्याचे अधिक चांगले प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अवजड वाहने सर्वांत कडेच्या मार्गिकेतून गेली, तर प्रवासी वाहनांना द्रुतगती मार्गावरचा प्रवास सुकर होईल. त्याचप्रमाणे, प्रवासी वाहनांनीही वेगमर्यादा पाळून आणि घाई न करता नियम पाळूनच मार्गक्रमण करायला हवे. या स्वयंशिस्तीचा आपल्याकडे अभाव जाणवतो.’
पोलिसांच्या कामाची प्रशंसा
श्रीहरी सोमण आणि अंकुर मुंगी यांनी पोलिसांनी केलेल्या कामाचे मात्र आवर्जून कौतुक केले. इतरही प्रवाशांनी पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त केले आहेत. पोलिसांनी परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले; तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याचीही काळजी घेतलीच. शिवाय, अडकलेल्या प्रवाशांना पाणी आणि खाद्यपदार्थाची पाकिटे पोहोचविण्यातही त्यांचाच पुढाकार होता.
प्रतिमेवर नकारात्मक परिणाम
पोलिसांनी त्यांना शक्य होते, ते सर्व केले, तसेच इतर यंत्रणांनीही का केले नाही, असाही सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. या कोंडीत अडकलेले पुण्याहून मुंबईकडे जाणारे अनेक प्रवासी मुंबई विमानतळावरून युरोप किंवा अमेरिकेच्या विमानांचा प्रवास करण्यासाठी निघाले होते. बहुतेकांना त्यांचे प्रवास रद्द करावे लागले किंवा तारखा बदलाव्या लागल्या. यात त्यांचे होणारे आर्थिक नुकसान हा एक भाग, पण युरोप-अमेरिकेतील त्यांच्या ग्राहकांवर आपल्या व्यवस्थेबाबत झालेली नकारात्मक प्रतिमा हा आणखी नुकसानदायी भाग आहे. कोंडीत अडकलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी तर त्रास भोगलाच, पण अशांच्या घरच्यांचीही वाट पाहताना काय अवस्था झाली असावी, याचा विचार यंत्रणा करणार का?
कोंडी टाळता येईल का?
अशी कोंडी टाळता येईल का, यावर म्हणूनच अधिक गांभीर्याने खल व्हायला हवा. सर्वांत आधी तशी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती हवी. मुळात द्रुतगती मार्गावरील वाहतूक गेल्या २५ वर्षांत टप्प्याटप्प्याने प्रचंड वाढली आहे. विविध ठिकाणी होणारी मालवाहतूक, कार्यालयीन बैठका, न्यायालयीन तारखा यांसह अन्य कामांसाठी दोन शहरांदरम्यान प्रवास करणारे प्रवासी आणि या मार्गाला जोडलेल्या पर्यटनस्थळांकडे जाणारे पर्यटक असे तीन प्रमुख पैलू आहेत. थोडक्यात, हा मार्ग आर्थिक दुवा असल्याने त्याची नीटच काळजी घ्यायला हवी. किंबहुना, या मार्गावरील प्रवासाच्या वेळेशी अनेक आर्थिक गणितेही जोडली गेलेली असल्याने यावर होणारी प्रत्येक मोठी कोंडी ही आपत्ती समजून त्याचे व्यवस्थापन व्हायला हवे.
घाटातील कोंडी दूर करण्यासाठीच्या साडेतेरा किलोमीटरच्या ‘मिसिंग लिंक’च्या प्रारंभाच्या केवळ नवनव्या तारखा जाहीर होतात, तो एकदाचा सुरू तरी करायला हवा. याशिवाय प्राथमिक बाब म्हणजे कोंडी असेल, तर ती कळविण्याची व्यवस्था. टोलनाक्यांवर जरी ही माहिती पोहोचवली आणि तेथूनच पर्यायी मार्गाने वाहतूक वळवायला सुरुवात केली, तर वाहतुकीवर येणारा पुढचा ताण वाचू शकतो. जे पर्यायी मार्ग आहेत, ते सुस्थितीत ठेवणे आणि पूर्ण न झालेले तातडीने पूर्ण करणे हाही प्राधान्याचा विषय असायला हवा. याशिवाय, घातक रसायने, वायू वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या चालकांचे प्रशिक्षण, या चालकांची टोलनाक्यावर तपासणी, वाहनांची फिटनेस चाचणी अशा काही बाबींकडेही काटेकोरपणे लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.
कोंडीचे अटळ वर्तमान
गेल्या ३ आणि ४ फेब्रुवारीला झालेल्या घटनेनंतर सरकारी पातळीवरही चक्रे हलली. आव्हानात्मक प्रसंगात मदतकार्य केले, तरी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना झालेला मनस्ताप आणि त्यांना सुविधा देण्यात कमी पडल्याची कबुली खुद्द पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच दिली, तर मुख्यमंत्र्यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. आगामी काळात अशा आपत्तींच्या वेळी कसा प्रतिसाद देता येईल, याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासही त्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला सांगितले आहे. आता प्रशासन आणि राजकीय व्यवस्था या घटनेचे उत्तरदायित्व स्वीकारून पुढील उपाययोजना तातडीने करतील, अशी आशा आहे. तोवर कोंडीचे वर्तमान टळणार नाही, हे वास्तव स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही.
siddharth.kelkar@expressindia.com

