Pune-Mumbai Highway Traffic Jam Video: पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लोणावळ्यात वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घाटात वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलिस वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तैनात असून, थोड्या – थोड्या वाहनांना जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला जात आहे.

लोणावळ्यात वाहतूक कोंडी

पीटीआय या वृत्तसंस्थेने लोणावळ्यात झालेल्या वाहतूक कोंडीचा व्हिडीओ एक्सवरुन शेअर केला आहे. घाटात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. अनेक वाहन चालक वाहनातून बाहेर येत वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत. रामनवमी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे.

प्रवाशांनी व्यक्त केला संताप

द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी वाहतूक कोंडीवरुन संताप व्यक्त केला. मुंबई पुणे एक्सप्रेस वेला ‘संथ मार्ग’ मार्ग म्हणून घोषित करा अशी खोचक मागणी एका नेटकऱ्याने केली. दररोज २५ ते ४५ मिनिटांचा उशीर होतो. आजपण २५ मिनिटं उशीर झाल्याचे नेटकऱ्यांने म्हटले आहे. 

नेहमीचीच वाहतूक कोंडीची समस्या

दोन प्रमुख महानगरांना जोडणारा मुंबई- पुणे महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे. देशातील एक सर्वात बिझी रोड म्हणून देखील त्याची ओळख आहे. लोणावळा भागात घाट रस्ता असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. दरम्यान, याच परिसरात एखादे वाहन बंद पडल्यास अथवा अपघात झाल्यास कोंडी निर्माण होते. घाटातील कोंडीवर मार्ग काढण्यासाठी मिसिंग लिंकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.