पुणे : अवयव प्रत्यारोपणासाठी भारती रुग्णालयातून काढण्यात आलेला मानवी अवयव अवघ्या अर्ध्या तासात विशेष विमानाने मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात सुखरूप पोहोचवण्यात आला. विमानतळ प्राधिकरण, विमान कंपनी, ग्राउंड हँडलिंग एजन्सी, सुरक्षा कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाच्या जलद समन्वयामुळे हे शक्य झाल्याची माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
मेसर्स झंकार एव्हिएशन कंपनीचे विशेष विमान या वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. या विमानाने दुपारी चार वाजता पुण्यातून मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. भारती रुग्णालयातून अवयव काढल्यानंतर तो विशेष इन्सुलेटेड आइस बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता. या बॉक्सला तीन थरांचे संरक्षक आवरण होते.
अवयव प्रत्यारोपणासाठी वेळेवर पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानुसार पुणे विमानतळाने सर्व यंत्रणांशी समन्वय साधून जलद वाहतुकीसाठी प्रयत्न केले. वैद्यकीय पथक आणि अवयवाचा बॉक्स थेट विमानापर्यंत पोहोचवण्याची सुविधा देण्यात आली. या प्रक्रियेदरम्यानही वाहतूक सुरक्षा आणि संरक्षण नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. अर्ध्या तासातच म्हणजे सायंकाळी साडेचार वाजता अवयव पोहोचवण्यात यश आले. त्यामुळे मुंबईतील वैद्यकीय पथकालाही वेळेत शस्त्रक्रिया करून अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण करता आली.
या बाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, ‘पुणे विमानतळाने यापूर्वीही अशा जीवनावश्यक वैद्यकीय वाहतुकीसाठी मदत केली आहे. जीव वाचवणाऱ्या सर्व वैद्यकीय वाहतुकीसाठी आम्ही जलद सुविधा आणि समन्वित पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्याचबरोबर विमान वाहतूक सुरक्षा आणि संरक्षण प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जाईल.’
