Pune Mumbai Highway Traffic Update: टँकर हटवल्यानंतर पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ३२ तासानंतर सुरळीत झाली. पण, महामार्गावर काही ठिकाणी अद्याप कोंडी कायम असल्याची माहिती समोर आली आहे. द्रुतगती मार्गासह जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर देखील काही ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे. मावळमधील उर्से भागात वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रवासी वाहतूक पूर्ववत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
३२ तासानंतर वाहतूक सुरळीत
खंडाळ्याजवळील आडोशी येथे गॅस वाहतूक करणारा टँकर मंगळवारी सायंकाळी पलटी झाल्यानंतर दोन महानगरांना जोडणारा पुणे – मुंबई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. प्रॉपलीन गॅस वाहतूक करणारा हा टँकर गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास हटवण्यात आला. यानंतर तब्बल ३२ तासानंर वाहतूक सुरळीत झाली. पण, अद्याप काही ठिकाणी कोंडी कायम असल्याची माहिती समोर आली आहे.
मावळमध्ये वाहनांच्या रांगा
मावळमध्ये उर्से भागात वाहनांच्या रांगा अद्याप कायम असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनधारकांकडून टोल नाक्यावर टोल वसूल केला जातो पण, पुढे असलेल्या वाहतूक कोंडीबाबत माहिती दिली जात नाही, अशी तक्रार वाहन धारक करत आहेत.
“आम्ही बुधवारी दुपारी कोल्हापूरमधून मुंबईला निघालो होतो. दुपारी पुण्यात येऊन अडकून पडलो. गुरुवारी सकाळी पुण्यातून प्रवास सुरु केला आणि आता इथं येऊन अडकलोय. टोल नाक्यावर टोल घेतला जातोय पण, वाहतूक कोंडीची माहिती दिली जात नाही. प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती मिळत नाही”, अशी तक्रार एका प्रवाशाने केली.
जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरही कोंडी
जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर देखील काही ठिकाणी वाहतूक कोंडी कायम असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तळेगाव, कामशेत, मळवली या भागात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या भागात बऱ्याच वेळेपासून वाहतूक खोळंबली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

