पुणे : मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटनांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे-मुंबई दरम्यानची एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.

सोमवारी (६ जुलै) सकाळी मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बसेस ‘उर्से टोल नाका’ परिसरातून माघारी बोलावण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे दोन्ही महामार्गावरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे.सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या ४ एसटी बसेस ‘उर्से टोल नाका’ परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आले आहे. कृपया प्रवाशांनी सहकार्य करावे आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचे नियोजन करू नये,’ असे एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले.