पुणे : राज्यात दस्तनोंदणीसाठी ६० खासगी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, पुणे, ठाणे, मुंबई आणि नागपूर या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात अत्याधुनिक सोयीसुविधा असणारी दुय्यम निबंधक कार्यालये येत्या जुलै महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी दिली.

राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुकर सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आदर्श दुय्यम निबंधक कार्यालये (मॉडेल ऑफिसेस) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील ६० दुय्यम निबंधक कार्यालये आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेद्वारे खासगी संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. एका खासगी संस्थेची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली असून, त्याबाबत करार करण्यात आला आहे.

‘पासपोर्टच्या धर्तीवर नागरिकांना उत्तम सोयीसुविधा आता खासगी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी दस्तनोंदणी करताना अतिरिक्त ५२०० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. पुण्यासह अन्य शहरांमध्ये येत्या जुलैमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागरिकांना दस्तनोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीने करता येणे हा आहे,’ असे मुठे यांनी सांगितले.

या खासगी कार्यालयात पूर्वनियोजित वेळेसाठी दस्तनोंदणीची सुविधा, मार्गदर्शन आणि सहायक केंद्र, डिजिटल टोकन प्रणाली, वायफाय सुविधा, स्वच्छ आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रतीक्षाकाळात अल्पोपाहार, बाटलीबंद पाणी अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.

‘जुलै महिन्यात खासगी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होणार आहेत. त्या ठिकाणी दस्तनोंदणी करणे नागरिकांना सक्तीचे नाही. ज्यांना चांगल्या सोयी-सुविधा हव्या आहेत, त्यांना त्या कार्यालयात जाऊन नोंदणी करता येईल,’ असे मुठे यांनी स्पष्ट केले.