गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे सध्या पुणे-मुंबईसह इतर मार्गावरील गाडय़ांना प्रवाशांची मागणी वाढली आहे. पुणे-मुंबई दरम्यानच्या गाडय़ांचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेता रेल्वेने तातडीने गाडय़ांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून बंद तीव्र केला आहे. राज्यात कोणत्याही आगारातून एसटीची एकही गाडी धावत नाही. अशा स्थितीत प्रशासनाकडून खासगी बस वाहतूकदारांमार्फत प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. मात्र, अनेक मार्गावर गाडय़ा कमी आहेत. पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वेला गेल्या तीन दिवसांत गर्दी वाढली आहे. सध्या पुणे ते मुंबई या मार्गावर पुण्यातून सकाळी ६.०५ वाजता सुटणारी सिंहगड, सव्वासात वाजता सुटणारी डेक्कन क्वीन, मुंबईतून सकाळी ६.०५ वाजता सुटणारी इंद्रायणी आणि पावणेसात वाजता सुटणारी डेक्कन एक्स्प्रेस या पाच गाडय़ा आहेत. करोनाच्या काळात बंद केलेली इंटरसिटी आणि प्रगती एक्स्प्रेस या दोन गाडय़ा अद्यापही बंद आहेत.

एसटीच्या बंदमुळे या सर्वच गाडय़ांना अचानक मोठी मागणी वाढली आहे. पुण्यातून सकाळी जाणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. पुणेमार्गे येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांनाही मागणी वाढली आहे. अशा स्थितीत गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी याबाबत सांगितले, की सध्या प्रवाशांची गरज असल्याने बंद असलेल्या प्रगती आणि इंटरसिटी या गाडय़ा तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. सुरू असलेल्या गाडय़ांच्या डब्यांची संख्या सतरावरून चोवीस करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पुणे-सोलापूर, कोल्हापूर यासह इतर मार्गावरही गाडय़ा आवश्यक आहेत. पुणे-मुंबई दरम्यानची इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्यात आल्यानंतर सोलापूरला सोडण्यात येत होती. ती सध्या बंद आहे. ही गाडीही रेल्वे प्रशासनाने तातडीने सुरू करावी.

आता रेल्वेने पुढाकार घ्यावा..

पुणे-लोणावळा दरम्यान सध्या लोकलच्या ४४ पैकी ११ फेऱ्या सुरू आहेत. सध्याची प्रवाशांची निकड लक्षात घेता या लोकलसह डेमू गाडय़ा बारामती, दौंड, सातारा, मिरज आदी मार्गावर सोडणे आवश्यक असल्याचे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी व्यक्त केले. रेल्वे सेवा बंद असताना एसटीच्या वतीने जादा गाडय़ा सोडून प्रवाशांची अडचण दूर केली जाते. आता एसटी बंद असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.