पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचे चित्र आहे. पुण्या-मुंबईसह देशातील प्रमुख सात शहरांमध्ये घरांची विक्री पहिल्या तिमाहीत सात टक्क्यांनी कमी झाली. तर, बांधकाम खर्च वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या सरासरी किमती ७ टक्क्यांनी वाढल्याचे अनारॉक ग्रुपच्या अहवालातून समोर आले आहे.

अनारॉकने जानेवारी ते मार्च २०२६ या पहिल्या तिमाहीत देशातील गृहनिर्माण क्षेत्राची उलाढाल मांडणारा अहवाल सादर केला आहे. या अहवालात मुंबई महानगर (एमएमआर), पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली-एनसीआर, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमधील घरांच्या विक्रीचा आढावा घेण्यात आला आहे.

मागील तिमाहीच्या तुलनेत यावर्षी पहिल्याच तिमाहीत चेन्नईतील घरांच्या विक्रीत सर्वाधिक १८ टक्क्यांची मोठी घट नोंदवण्यात आली. पुण्यातील घरांच्या विक्रीत १० टक्क्यांची घट झाली असून, प्रत्यक्ष विक्री १५ हजार ३०० घरांवर आली आहे. विक्री मंदावल्यामुळे नवीन घरांच्या पुरवठ्यातही ९ टक्क्यांची घट झाली आहे. तर, मुंबई महानगरातही घरांच्या विक्रीत ६ टक्क्यांची घट झाली असून, पहिल्या तिमाहीत ३२ हजार ८०० घरांची विक्री झाली. मुंबईत दिडकोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ‘लक्झरी’ घरांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. तर, पुण्यातील नवीन घरांपैकी ८७ टक्के घरांची किंमत ४० लाख ते दीडकोटी रुपये आहे.

दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये घरांची विक्री ८ टक्क्यांनी कमी झाली. तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्ली-एनसीआरमधील घरांच्या किमती देशात सर्वाधिक १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. बेंगळुरूमध्येही घरांची विक्री ५ टक्क्यांनी घटली. तर, किमतीत ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत बेंगळुरूमध्ये न विकलेल्या घरांची संख्या सर्वाधिक २४ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये घरखरेदीला घरघर लागली असताना हैद्राबादमध्ये मात्र घरांची मागणी कायम आहे. तसेच नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या ४६ टक्क्यांनी वाढली आहे.

दरम्यान, मागील तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत १ लाख ६० हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली. यावर्षी मात्र पहिल्या तिमाहीत यात पाच टक्क्यांनी घसरण झाली असून, १ लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे. तसेच मागणी नसल्याने देशात सुमारे ६ लाख नवी घरे विक्रीविना पडून राहल्याचे निरिक्षणही या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

परवडणाऱ्या घरांची परवड

बाजारात परवडणाऱ्या घरांपेक्षा श्रीमंत वर्गासाठीच्या ‘लक्झरी’ घरांची वाढत असल्याचे निरिक्षण अनारॉक ग्रुपच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. नवीन बांधल्या जाणाऱ्या घरांपैकी सुमारे ५२ टक्के घरे दिड कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहेत. तर, ४० लाखांच्या आतील परवडणाऱ्या घरांची संख्या केवळ १० टक्के आहे.

सध्या इराण-इस्रायल युद्धामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चटके बसत आहेत. आखातात राहणाऱ्या भारतीयांनी घर खरेदी लांबणीवर टाकल्याचे दिसते. कच्च्या तेलाच्या किमती आणि बांधकाम साहित्याचा खर्च वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी मार्च महिन्यात घरांच्या विक्रिवर मोठा परिणाम झाला.

-अनुज पुरी, अध्यक्ष, अ‍ॅनारॉक ग्रुप