पुणे : पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने विशेष काळजी घेण्याचे ठरविले आहे. पालखी मुक्कामी असलेल्या भागात वारकऱ्यांच्या सोयीसाठी सहा ‘जर्मन हँगर मांडव’ टाकले जाणार आहेत. तसेच, पत्र्यांचे १९५ मांडवदेखील उभारले जाणार असल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुढील आठवड्यात शहरात दाखल होणार आहे. या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी महापौर नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. विविध खात्यांचे विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालखी सोहळ्यानिमित्त करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती नागपुरे यांनी दिली.

यंदाच्या पालखी सोहळ्यानिमित्त महापालिका ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम राबविणार आहे. ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून पुणे शहरात होणाऱ्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाचे दस्तावेजीकरण करण्याचा उद्देश या माध्यमातून साधला जाणार आहे. पालखीच्या निमित्ताने लाखो वारकरी शहरात येणार आहेत. त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून, प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

शहरात दाखल हाेणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवेइतकीच पवित्र मानून या उपक्रमाला ‘सेवा वारी’ असे नाव देण्यात आले आहे. पालखीची परंपरा, वारीचे सांस्कृतिक महत्त्व आणि पुण्यनगरीची आध्यात्मिक ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचावी हा यामागील हेतू आहे. या उपक्रमांतर्गत छायाचित्र स्पर्धा तसेच ० ते १६ वयोगटासाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पालखी पुणे शहरात असल्याने शहरातील रस्ते, भाग तसेच ज्या ठिकाणी वारकरी मुक्कामी असणार आहेत. तेथील परिसर स्वच्छ कसा राहील, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

‘शहरात आगमन झाल्यानंतर पालखी सोहळा ज्या मार्गावरून जाणार आहे तेथील स्वच्छता, जनजागृती आणि सेवा कार्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. यंदा ‘सेवा वारी’ हा उद्देश असल्याने शहरातील विविध स्वंयसेवी संस्था, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन सेवा द्यावी,’ असे आवाहन महापौर नागपुरे यांनी पुणेकरांना केले आहे.

‘सेवा वारी’ या उपक्रमाची सांगता १० जुलैला रात्री ९ वाजता सामूहिक ‘पसायदान’ म्हणून होणार आहे. विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी पुणेकरांनी जिथे असतील तिथून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, पालखी सोहळा शहरात दाखल होणार असल्याने नागरिकांनी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी महापालिकेच्या सेवा वारी उपक्रमात सहभागी व्हावी. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी डीजे, मोठ्या आवाजातील स्पीकर्स लावू नये. मोठ्या स्पीकर्सचा दिंडीतील वारकऱ्यांना त्रास होतो. ते टाळण्याचा प्रयत्न करावा.

महापालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये आरोग्य व्यवस्था, राहण्यासाठी शाळा, फरती शौचालये, थांबण्यासाठी मंडप, यांचा समावेश आहे.

  • २ हजार शौचालयांची व्यवस्था
  • ६ जर्मन हँगर शेड्स
  • १९५ मंडप
  • १८० फिजिओथेरपिस्ट
  • ४०० मेडिकल किट्स
  • २० रुग्णवाहिका २२ खासगी रुग्णवाहीका
  • ४० आरोग्य पथके
  • १०० वैद्यकीय विद्यार्थी
  • ४० वैद्यकीय कक्ष
  • जागोजागी हिरकणी कक्ष