पुणे : महापालिकेने निश्चित केलेल्या अंतरापेक्षा दररोज अधिक किलोमीटर लांबीची रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला पथ विभागाने नोटीस देत काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने केल्या जाणाऱ्या रस्ते खोदाईमुळे नागरिकांचा रोष महापालिका प्रशासनाला सहन करावा लागत असल्याचे कारण देत पथ विभागाने रस्ते खोदाईच्या परवानगीला स्थगिती दिली आहे. खोदलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजवून त्याचा फोटोसह अहवाल देण्याचा आदेश पथ विभागाने दिला आहे.

पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी हे आदेश दिले आहेत. शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पाेलीस प्रशासनाकडून सीसीटीव्ही यंत्रणा प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच महाप्रीतकडून वीज पुरवठ्यासाठी वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या कामांसाठी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागांतील रस्ते खोदले जात आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी केबल टाकताना केवळ रस्ते नाही, तर फूटपाथ देखील खोदले जात आहेत. यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खाेदल्या जाणाऱ्या रस्त्यांची याेग्य पद्धतीने दुरुस्ती हाेत नसल्याने किरकाेळ अपघातही घडत आहेत. तसेच नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहे.अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

दिनेश इंजिनिअरींग लिमिटेड या ठेकेदार कंपनीला ही नोटीस देण्यात आली आहे. पथ विभागाच्या लेखी आदेशानंतरच पुढील खाेदाई सुरू करावी. या नाेटिशीची तातडीने दखल घेऊन खोदलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजवून त्याचा अहवाल फोटोसह पथ विभागाकडे सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी रस्ते खोदले जात आहेत. रस्ते खोदण्यात येत असल्याचे कोणतेही फलक नागरिकांच्या माहितीसाठी लावले जात नाहीत. रस्ते खोदाई बाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांना माहिती दिली जात नाही. दररोज ठराविक अंतराचे रस्ते खोदून काम पूर्ण करून ते बुजविण्यात यावेत. त्यानंतर पुढील रस्त्याची खोदाई करावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित ठेकेदाराला वारंवार महापालिकेने दिल्या आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत रस्ते खोदाई सुरूच ठेवली जाते.

पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर म्हणाले, सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी खोदाईची परवानगी देताना महापालिकेने काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये ठेकेदाराने पाचशे मीटर लांबीची खोदाई करून काम झाल्यानंतर त्याची डागडुजी करण्याची अट आहे. त्यानंतर उर्वरित खोदाई सुरू करायच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ठेकेदाराला रस्ते खोदाई करण्यास मनाई करण्यात आली आहे.