पुणे : पुणे महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था ढासळण्याचे खापर महापालिका प्रशासनावर फोडणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच आरसा दाखविला. ‘महापालिकेत सुरक्षारक्षकांची नियुक्ती शिफारशींवर होते. गुणवत्तेची कसून पडताळणी होत नाही. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत, ही वस्तुस्थिती आहे,’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीबाबत बाजू मांडली.

‘मला भरतीचे पूर्ण अधिकार दिल्यास एका महिन्यात महापालिकेची सुरक्षा व्यवस्था पोलीस दलाच्या धर्तीवर उभी करू शकतो,’ असेही वक्तव्य त्यांनी केले. महापालिकेची सुरक्षा व्यवस्था ढासळल्याची टीका नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. त्याला उत्तर देताना आयुक्तांनी सुरक्षा व्यवस्थेची स्थिती मांडली. महापालिकेत केल्या जाणाऱ्या आंदोलनांवरून नगरसेवकांनी हा प्रश्न उपस्थित केला.

आयुक्त राम म्हणाले, ‘महापालिकेची सुरक्षा यंत्रणा पोलीस दलासारखी प्रशिक्षित नाही. अनेक सुरक्षारक्षकांना पुरेसे प्रशिक्षणही मिळालेले नाही. सर्वांत गंभीर बाब म्हणजे महापालिकेत होणारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती शिफारशींवर होते. प्रशासनाला त्यांचे काम करून देण्याचे अधिकार दिले, तर तक्रार करण्याची वेळच येणार नाही.’

महापालिकेची खास सर्वसाधारण सभा नवीन इमारतीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. त्या वेळी सभागृहाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ‘पीएमपीएमएल’मध्ये झालेल्या भरतीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महापालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर बोट ठेवले.

ते म्हणाले, ‘महापालिकेत कोणीही कुठूनही येऊ शकतो. कोणालाही सुरक्षारक्षकांकडून हटकले जात नाही. यापूर्वीदेखील महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांकडून सभागृहाच्या बाहेर आंदोलने झाली आहेत. सुरक्षा अधिकारी काय काम करतात? इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक महापालिकेत कसे येऊ शकतात? उद्या आंदोलन करणाऱ्या संघटना सभागृहातदेखील आल्यास त्यामध्ये आश्चर्य वाटू नये.’

विरोधी पक्षनेते नीलेश निकम, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळे आंदोलने होत असल्याचे सांगून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. महापालिकेत बॉम्ब ठेवल्याचा कॉल आला; विविध गैरप्रकार घडले. हे सर्व सुरक्षा यंत्रणा सक्षम नसल्याचे द्योतक आहे. अनेक प्रवेशद्वारांवर प्रभावी तपासणी होत नाही. प्रवेशद्वारांची संख्या कमी करून एका महिन्याच्या आत सुरक्षाव्यवस्था चोख व्हायला हवी.