पुणे : शहरातील विविध भागातील विकासकामे प्रलंबित असून वारंवार सांगूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आल्याचा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला होता. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सभासदांनी कडक शब्दात सुनावले होते.

या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्त सक्रिय झाले असून रस्त्यावर उतरून विविध भागात पाहणी करण्यास आयुक्त नवल किशोर राम यांनी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून आयुक्त राम यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील रखडलेली विकासकामे, मिसिंग लिंक, भूसंपादन आणि स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यामुळे या रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. या परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करत प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचा आदेश आयुक्त राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

शहरातील विविध भागातील विकासकामे रखडलेली असून महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जातो. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील सभासदांकडून रखडलेल्या कामाबाबत विचारणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राम यांनी विविध क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

येरवडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा शनिवारी आढावा घेण्यात आला. रस्ते दुरुस्ती, देखभाल, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मिसिंग लिंक, भूसंपादन आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती त्यांनी घेतली. यावेळी उपायुक्त आशा राऊत, घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, पथ विभागाचे अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे आदी उपस्थित होते.

‘मिसिंग लिंक’ला भूसंपादनाचा अडथळा

शिवणे–खराडी नदीकाठच्या रस्त्यावरील मिसिंग लिंक, ग्रँट रोड-नगर रस्त्यावरील जंक्शनजवळील रस्ता रुंदीकरण, वडगावशेरी नदीकाठच्या रस्त्यावरील मिसिंग लिंक आणि वाघोलीतील प्रस्तावित १८ मीटर रुंदीच्या उत्तर-दक्षिण रस्त्याच्या मिसिंग लिंक कामाची माहिती यावेळी आयुक्तांनी घेतली.
काही प्रकल्प भूसंपादनाच्या अडचणींमुळे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या प्रमुख रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

हरित जागांचा विस्तार करण्याच्या सूचना

वाघोली परिसरातील नाला गार्डनची पाहणी करताना आयुक्तांनी नैसर्गिक घटकांचा योग्य वापर करून विकसित केलेल्या जागेचे कौतुक केले. महापालिकेच्या उपलब्ध जागांचा योग्य वापर करून नागरिकांसाठी अशाच हरित जागा विकसित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अशा जागा शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी ‘शहराची फुफ्फुसे’ म्हणून महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असे आयुक्तांनी नमूद केले.