पुणे : महापालिकेच्या ठेक्यावरून झालेल्या वादावादीत परस्परांवर दाखल झालेल्या गुन्हे प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. परस्परांत झालेल्या हाणामारीचे मूळ प्रत्यक्षात पनवेलमधील एका बारमध्ये झालेल्या भांडणात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील ठेका मिळविण्याच्या वादातून खडक पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात ‘ठेकेदाराने रिव्हॉल्वर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली,’ अशी फिर्याद भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता निर्मल हरिहर यांनी दिली होती, तर भाजप कार्यकर्त्याकडे दीड तोळ्याची सोनसाखळी मागण्यासाठी गेलो, तेव्हा मारहाण करण्यात आल्याची फिर्याद मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते यांनी पोलिसांकडे दिली होती. गंज पेठेत हा प्रकार घडला होता. हेही वाचा.पुणे: खडकवासला धरणातून विसर्गात वाढ, सतर्क राहण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन मात्र, या प्रकरणापूर्वी घडलेली एक कहाणी या वादाला कारणीभूत ठरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिते आणि त्यांचा मित्र कमलेश क्षीरसागर पनवेल येथील बिंदास ऑर्केस्ट्रा बारमध्ये २० जुलै रोजी गेले होते. त्या वेळी गिते यांच्या ओळखीचे निर्मल हरिहर चार मित्रांसोबत तेथे आले होते. मध्यरात्री सर्वजण बारमध्ये नृत्य करत असताना, निर्मल हरिहर यांनी गिते यांना धक्का दिला. त्यामुळे, ‘मला धक्का का दिला,’ अशी विचारणा गिते यांनी हरिहर यांच्याकडे केली. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. हेही वाचा.“शरद पवारांवर बोललेलं लोकांना पटत नाही, म्हणूनच अजित पवारांनी…”, रोहित पवार म्हणाले… या घटनेनंतर गिते पुण्यात आले आणि हरिहर यांनी गळ्यातील ९० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावल्याची तक्रार त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ई-मेलद्वारे दिली. या घटनेनंतर हरिहर आणि गिते यांच्यात गंज पेठेत पुन्हा वाद झाला. त्यातून दोघांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी निर्मल हरिहर (रा. २३१, गंजपेठ, पुणे) यांच्याविरुद्ध नवीन पनवेल पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.