पुणे : बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील स्वामी विवेकानंद रस्त्यावर महापालिकेने बसविलेले १०० एलईडी दिवे चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका प्रशासनानेच याची माहिती दिली असून, चोर सापडले नसल्याचे म्हटले आहे. एका दिव्याची किंमत १५ हजार ७५० रुपये इतकी होती.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका मानसी देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील १०० दिवे चोरीला गेल्याचे सांगितले. दिवे चोरीला गेल्याने बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडे तक्रार दिली. मात्र, या चोरीच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. महापालिकेच्या जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या प्रश्नोत्तरात चोरीची ही माहिती प्रशासनाने दिली.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महापालिकेने शोभिवंत, आकर्षक दिवे लावले होते. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. महापालिकेकडे आलेल्या निविदेमध्ये प्रति दिवा महापालिकेला १५ हजार ७५० रुपयांना पडला होता. स्वामी विवेकानंद रस्त्यावर लावण्यात आलेले हे १०० दिवे चोरीला गेले. दिवे चोरीला गेल्याने क्षेत्रीय कार्यालयाने त्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये २२ नोव्हेंबर २०२६ रोजी नोंदविली आहे.

‘अद्यापही दिवे चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध लागलेला नाही. पोलिसांकडे महापालिकेने अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, आरोपी न मिळाल्याने तपास थांबविण्यात आला असून, आरोपी सापडल्यानंतर या प्रकाराचा तपास सुरू केला जाईल,’ असे बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकांनी कळविले असल्याचे या उत्तरात म्हटले आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेचे रस्त्यावरील १०० शोभिवंत दिवे चोरीला गेल्यानंतरही संबंधित प्रकरणात अद्याप कोणावरही कारवाई झालेली नसल्याचा अहवाल बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून तसेच महापालिकेच्या इतर विभागांकडून महापालिका आयुक्तांना देण्यात आला नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

दिवे १६ लाखांचे, पण तक्रार अडीच लाखांचीच !

महापालिकेचे रस्त्यावर लावण्यात आलेले शोभिवंत १०० दिवे चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदविताना क्षेत्रीय कार्यालयाने चोरीची अंदाजे रक्कम २ लाख ६० हजार असल्याचे सांगितले. तर, प्रशासनाने काढलेल्या निविदेमध्ये प्रत्येक एलईडी दिव्याची किंमत १५ हजार ७५० रुपये असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. याचा हिशोब केला तर १५ लाख ७५ हजार रुपयांचे दिवे होतात. मग पोलिसांत तक्रार नोंदविताना केवळ २ लाख ६० हजारांचा माल चोरीला गेला, असे का दाखविण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.