पुणे : शहरात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात पुणे महापालिकेने कारवाई कायम ठेवली असून, २०१३ ते २०२६ या १३ वर्षांच्या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित ठिकाणी पुन्हा बेकायदा वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची २२ वी बैठक २९ जुलै रोजी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला महापालिकेचे आरोग्य अधिकारी, मुख्य विधी अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेकायदा वैद्यकीय व्यवसायाला आळा घालणे आणि त्या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. दाखल गुन्ह्यांची सद्य:स्थिती काय आहे, कारवाई झालेल्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने पुन्हा व्यवसाय सुरू केला आहे का, याची माहिती आरोग्य विभागाने अद्ययावत ठेवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

कोंढव्यात गुन्हा दाखल

महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध विभागाकडे आलेल्या तक्रारीच्या आधारे के. डी. एम. (KDM) यांच्याविरुद्ध तपास करण्यात आला. विधी विभागाचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार २७ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘डॉक्टरची नोंदणी तपासा’

मान्यताप्राप्त वैद्यकीय कौन्सिलकडे नोंदणी असलेले एमबीबीएस बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि बीडीएस पदवीधारक आणि मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवीधारकांनाच संबंधित वैद्यकीय व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. नागरिकांनी उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरची वैध वैद्यकीय नोंदणी आणि शैक्षणिक पात्रता तपासावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.