पुणे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वार्षिक २१.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढ्या पाणीकोट्याची मागणी करणाऱ्या महापालिकेकडून मात्र गळतीकडे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत नळजोडांबरोबरच जलकेंद्रातून राजरोस होणारी पाणीचोरी आणि गळती यामुळे पाणीगळतीचे प्रमाण तब्बल ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तशी कबुलीच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या गळतीचे पाणी नेमके मुरते कुठे आणि कसे, तसेच त्याचा नेमका फायदा कोणाला होतो, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सन २०२४-२५ या वर्षासाठी २१.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोट्याची मागणी महापालिकेने केली आहे. महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे सादर केले आहे. या पाणी अंदाजपत्रकामध्ये तब्बल ३५ टक्के गळती होत असल्याची कबुली महापालिका प्रशानसाकडून देण्यात आली आहे. ३५ टक्क्यानुसार पाणी गळतीचा विचार करता तब्बल सात टीएमसीपेक्षा जास्त पाणी वितरणातील त्रुटी आणि दुर्लक्षामुळे वाया जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. हेही वाचा >>>कर्करोगावर उपचारासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर! ‘रेडीझॅक्ट एक्स ९ टोमोथेरपी’ ठरतेय रूग्णांसाठी वरदान गेल्या काही वर्षांपासून वितरणातील त्रुटीमुळे होणाऱ्या पाणी गळतीचा मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे. शहरातील पाणी गळतीचे प्रमाण काही वर्षांपर्यंत ४० टक्क्यांपर्यंत होते. मात्र गेल्या काही वर्षात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पाणी गळती पाच टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, पस्तीस टक्के पाणी गळती कायम आहे. ३५ टक्के गळती कशाच्या आधारे? शहरासाठी वाढीव पाणीकोट्याची मागणी करताना जलसंपदा विभागाला सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये पाणी गळतीचा केवळ उल्लेख केला आहे. मात्र पाणी गळती कशी आणि कोठून होते, यावर सोईस्कर मौन बाळगण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत महापालिका थेट कालव्यातून पाणी उचलत होते. त्यामुळे पाणी चोरी आणि गळतीचे प्रमाणही मोठे होते. मात्र आता बंद जलवाहिन्यांद्वारे जलकेंद्राला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे गळती कशामुळे होते, याची कारणमीमांसा महापालिकेने अंदाजपत्रकात स्पष्ट केलेली नाही. ३५ टक्के हे प्रमाण कशाच्या आधारे काढण्यात आले, याचेही स्पष्टीकरण अंदाजपत्रकात देण्यात आलेले नाही. पाणी गळती विविध कारणांनी होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेनंतर गळती १५ टक्क्यंपर्यंत कमी होईल. सध्या मुख्य वाहिन्यांवरील गळती कमी केली आहे. शहराची गेल्या वर्षभरातील पाणी वापराची आकडेवारी पाहिली तर, गळतीचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षात येते. येत्या काही दिवासात गळती रोखण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील.- नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका