इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
– सुरेश भट
कविवर्यांचा हा अनुभव जिवंतपणीच येणाऱ्या प्रत्येकाला, त्याच्या आप्तेष्टांच्या मृत्युनंतरही येतच राहावा, अशी योजना पुणे महानगरपालिकेने जाणूनबुजून तर केली नसेल? जगताना छळणे थांबलेलेच नसते, पण मृत्युनंतरही हा छळ संपू नये, असे पालिकेला का वाटत असेल? की अपुरे रस्ते, पाणी पुरवठ्यातील गोंधळ, अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारख्या समस्यांनी पुणेकर पुरेसे त्रासलेले नसावेत, म्हणूनच मृत्युदाखला मिळण्यातही प्रचंड अडचणी निर्माण करत, मरणानेही छळण्याचा हा डाव पालिकेने मांडला असावा? मृत्युची नोंद करून घेतल्यानंतर लगेचच त्याचा दाखला मिळू न देण्यात पालिकेच्या प्रशासनाला काय विकृत आनंद मिळतो, हे कळावयास मार्ग नाही. पण नातेवाईकांनी कामधंदे सोडून मृत्यू दाखल्यासाठी पालिकेच्या कार्यालयात अजीजी करावी, यात काय साध्य होते?
पुण्यासारख्या तथाकथित प्रगत शहरात साधी मृत्यू दाखला त्वरित मिळण्याची व्यवस्था निर्माण करता येऊ नये, ही बाब कुणाच्याही लक्षातच कशी येत नाही? पालिकेकडे केलेल्या तक्रारींचे निवारण किती प्रमाणात होते, हा संशोधनाचा विषय. त्यातून समाजमाध्यमांवर अशा तक्रारी केल्या, तर प्रत्येकवेळी तुमच्या तक्रारीची नोंद घेतली आहे, असे छापील उत्तर देण्यात कसली आली कार्यक्षमता? हा निर्लज्जपणा दूर करावा, असे प्रशासनातील उच्चपदस्थांना तर वाटतच नाही, पण त्यांच्यावर अंकुश ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही वाटत नाही. सामान्यांनी हेलपाटे मारायचे आणि दाखला देणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीपुढे हात टेकायचे, हे या शहरातील प्रत्येक मृत पावलेल्या नागरिकाच्या नातेवाईकाच्या वाट्याला आलेले संतापजनक वास्तव आहे.
हेही वाचा – पुणे : पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरणारी टोळी गजाआड
गेली कित्येक वर्षे मृत्यू दाखला वेळेवर मिळू नये, यासाठीच सारी यंत्रणा एकजुटीने प्रयत्न करते आहे. त्याविरुद्ध कुणी ब्र काढत नाही. काढू शकत नाही. एवढी दहशत अन्य कोणत्या विभागात असेल? घरात कुणाचाही मृत्यू झाला, की स्मशानभूमीत नेण्यापूर्वी पालिकेकडून पास घ्यावा लागतो. सामान्यतः हे काम जवळचे कुणीतरी करत असते. हे काम फार महत्त्वाचे असते, हे माहीत असले, तरी पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सुशिक्षितपणावर अंधविश्वास ठेवून त्या पासावरील मृत व्यक्तीच्या नावात जराशी चूक झाली, तर नंतरची अनेक वर्षे ती दुरुस्त करण्यासाठी नातेवाईकांना जीव नकोसा होतो. मृत्यू दाखल्यातील इंग्रजी स्पेलिंगमधील चूक हा तर जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला आलेला मनस्ताप! पण या सगळ्या त्रासाला न कंटाळता सामोरे जाण्याशिवाय कुणालाही कुठलाही पर्याय नसतो.
मुळात प्रशासन नावाची काही व्यवस्था नागरिकांना जिथे जिथे अनुभवायला येते, तिथे तिथे अधिक लक्ष घालून ती यंत्रणा कमालीची कार्यक्षम करणे अधिक महत्त्वाचे. पण पालिका येथील समस्तांनाही कायमच गृहित धरत आल्यामुळे दुर्मुखलेल्या चेहऱ्याचे कर्मचारी मृत्यू दाखला कार्यालयातही मुद्दाम नेमण्यात आले असावेत की काय, अशी शंका येते. एका हेलपाट्यात काम झालेला या शहरात एकही नागरिक नसावा. त्याला खूपवेळा यावे लागल्याशिवाय, त्याचे काम होताच कामा नये, अशा सूचना तर वरिष्ठांनी तेथील कर्मचाऱ्यांना दिलेल्या नसतील ना? या कार्यालयातील संगणकीय यंत्रणा कायमच नादुरुस्त असते. दाखल्याची प्रत काढणारा प्रिंटर नेहमीच बिघडलेला असतो. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे तेथील कर्मचारी सांगत असले, तरी त्यांचे कुणी फारसे ऐकत नसावे. त्याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना बसतो.
हेही वाचा – सावधान! पुण्यात बोगस औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून तीन विक्रेत्यांवर कारवाई
जगताना रोजच्या रोज पालिकेला शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या आप्तेष्टांच्या मृत्युंतरही शिव्यांचे अर्घ्य देण्यावाचून पर्याय असू नये, हे दुर्दैव. यात सुधारणा होण्याची शक्यता जवळजवळ दुरापास्त. कारण या देशात कोणतीही यंत्रणा बिनचूकपणे काम करण्याबाबत पुरेशी आग्रही नसते. ही या देशाची सांस्कृतिकता असावी. त्यात सुधारणा व्हावी, असे प्रत्येकाला वाटत असते, मात्र त्यासाठी कुणीही फारसे प्रयत्न करताना दिसत नाही. पुणे पालिकेने याबाबत आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी दवडता कामा नये, निदान मेल्यानंतरच्या यातना कमी करण्याचे श्रेय तरी घ्यावेच.
mukundsangoram@gmail.com