पुणे : गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्र आणि डोंगरमाथा परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याबरोबरच माती, गाळ धरणात येत आहे. परिणामी धरणाच्या पाण्यात गढूळपणा वाढल्याने नागरिकांकडून खराब पाणी येत असलेल्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिका आवश्यक काळजी घेत असून, नागरिकांनीही पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून धरणातून घेतले जाणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शुद्ध केले जाते. मात्र, सध्या पाण्यातील गढूळपणाची पातळी जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने संपूर्णपणे पारदर्शक पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये नागरिकांना गढूळ स्वरूपात पाणी मिळत आहे.

महापालिका पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक काळजी घेत असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी तुरटी फिरवून आणि व उकळून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांनी अधिक काळजी घ्यावी. महापालिकेत आलेल्या नांदेड, नांदोशी, किरकीटवाडी, खडकवासला, सणसनगर, धायरी, नन्हे या परिसरात पाणी प्रक्रिया न होता केवळ निर्जंतुकीकरण करून पुरविले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या वतीने दिले जाणारे पाणी मानकांनुसार पिण्यास योग्य असले तरी त्यामध्ये गढूळतेचे प्रमाण अधिक आहे. शहराच्या काही भागातून याबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी शक्यतो पाणी उकळून प्यावे.- नंदकिशोर जगताप,विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका