पुणे : ‘सामाजिक क्षेत्रात काम नसलेल्या एका संस्थेला बाणेर येथील महापालिकेची ४० कोटी रुपयांची मिळकत केवळ ५०० रुपये किमतीच्या बाँडवर देण्यात आली आहे. या संस्थेकडून येथे रुग्णालय चालविले जात असून, त्यामध्ये महापालिकेला एकही मोफत बेड मिळत नाही,’ असा आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हा आरोप केला.
महापालिकेकडून मिळालेल्या मिळकतीवर बाणेर येथे एका फाऊंडेशनकडून हॉस्पिटल चालविले जात आहे. या हॉस्पिटलमध्ये १ महिन्याच्या मुलीवर ‘एनआयसीयू’मध्ये उपचार सुरू असून, त्यांना संपूर्ण बिल भरण्यास सांगण्यात आले. ही मुलगी महापालिकेत काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याची आहे. कुटुंबीयांनी महात्मा फुले आरोग्य योजनेची कागदपत्रे देऊनही पैशांची मागणी केली असून, मुलीला रुग्णालयातून सोडले जात नाही.
‘महापालिकेची मालमत्ता वापरूनही त्याचा लाभ शहरातील नागरिकांना होत नाही. त्यामुळे ही मालमत्ता कोणत्या नियमानुसार त्या फाऊंडेशनला देण्यात आली याची माहिती द्यावी,’ अशी मागणी बालवडकर यांनी दिली. त्यानंतर नगरसेवक अजय खेडेकर यांनी ‘शहरातील रुग्णालयांमध्ये ‘शहरी गरीब योजना’, ‘महात्मा फुले योजना’ यासह केंद्राची ‘आयुष्मान भारत योजने’चे कार्ड चालत नाही,’ असे सांगितले. विरोध पक्षनेते नीलेश निकम, नगरसेविका अर्चना पाटील, सचिन दोडके, वैशाली भालेराव यांनीही आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
नगरसेवकांच्या आक्षेपांवर महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी खुलासा करताना, तक्रारदार नगरसेवकांशी व्यक्तिगत बोलून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच, खाटांच्या संदर्भात डॅशबोर्ड तयार करण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल असे सांगितले. यावर महापौर मंजूषा नागपुरे यांनी नगरसेवकांच्या प्रश्नांचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर मांडण्याचे आदेश दिले.
‘मोबाईल ॲप तयार करावे’
शहरातील महापालिका, पीपीपी, खासगी व धर्मादाय रुग्णालयांत गरीब व गरजू रुग्णांसाठी खाटा आरक्षित असतात. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून बेड शिल्लक नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे सर्व रुग्णालयांतील बेड उपलब्ध असल्याची माहिती मोबाइलवर मिळाली पाहिजे, त्यासाठी मोबाइल ॲप तयार करावे. त्यात, रुग्णालयाचे नाव, आरक्षित बेडची संख्या तसेच उपलब्ध असलेले बेड व उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती द्यावी, अशी मागणी नगरसेवक सचिन दोडके यांनी केली.
