पुणे : विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या पुणे शहराच्या महापालिकेतील काही ‘माननीय’ सध्या या बिरुदांच्या विपरीत वर्तन करत असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसले. ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे ‘वेगळेपण’ हेच का, असा प्रश्न यानिमित्ताने पुणेकरांना पडला आहे. विरोधी पक्षांतील काही ‘माननीय’ही अशा वर्तनाला अपवाद नसल्याने लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणाची गरज अधोरेखित झाली आहे.
महापालिकेच्या आवारात पिस्तुलासह प्रवेश, आजी-माजी नगरसेविकांमधील खडाजंगी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना वरिष्ठ लोकप्रतिनिधींकडून वापरली गेलेली आक्षेपार्ह भाषा, सभागृहात येताना महापौरांसमोर कसे वागायचे, याचे संकेत धुडकावणे अशा काही घटना हेच सत्ता स्थापनेनंतरच्या दोन महिन्यांत पुणेकरांना दिसलेले सत्ताधारी भाजपचे ‘वेगळेपण’. विरोधी पक्ष म्हणून काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस या पक्षांतील काही ‘माननीयां’बाबतही असेच अनुभव येत असल्याचे चित्र आहे.
महापौरांनी सभागृहात केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, पीठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकारांना थेट आव्हान देणे, असेही प्रकार घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर, नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेचे नियम आणि संकेत याचे मार्गदर्शन का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सभागृहात शस्त्रांचा शिरकाव
मध्यंतरी सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहताना काही माननीय कमरेला पिस्तूल लावूनच आले. मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी नाके असतानाही, ही शस्त्रे सभागृहात पोहोचली कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या संरक्षणासाठी परवाना असलेली पिस्तुले घेतली असली, तरी ती लोकशाही पद्धतीने काम करणे अपेक्षित असलेल्या महापालिकेत घेऊन यायची नसतात, हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सांगितले नव्हते का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला.
चर्चेचा खालावलेला दर्जा
शहराच्या विकासकामांवर, पाणीपुरवठ्यावर किंवा वाहतुकीच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी करण्याऐवजी, एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यातच सदस्यांची शक्ती खर्च होत असल्याचे दिसते. गोंधळ घालून सभा तहकूब करण्यामध्येच काही पदाधिकारी आणि नगरसेवकांना आनंद मिळतो. लोकप्रतिनिधींच्या या बेजबाबदार वर्तणुकीमुळे महापालिकेची प्रतिमा डागाळली जात असल्याची चर्चा महापालिकेत आहे.
महापौरांकडे दुर्लक्ष
काही दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना काही नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेऊन महापौरांच्याही सूचनांकडे दुर्लक्ष केले. सभागृहात गोंधळ, घोषणाबाजी आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे सभेचे कामकाज विस्कळीत झाले. महापौरांनी सभागृहात शांतता राखण्याचे आवाहन अनेकदा केले. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
वर्तनावर अंकुश नाही
महापौर त्यांच्या जागेवर आसनस्थ झाल्यानंतर संकेत न पाळता सभागृहात हसत खेळत जा-ये करणे, महापौरांनी बोलण्यास संधी न दिल्यास आक्रमकपणे जागेवरच उभे राहून भूमिका मांडणे, महापौरांच्या अधिकारांचा आदर राखण्याऐवजी अडथळा आणणे, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, गटनेते यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे असे काही प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसते.
याबाबत बोलताना माजी महापौर वंदना चव्हाण म्हणाल्या, महापालिकेच्या सभागृहाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ सभासदांनी सदस्यांना त्याची आठवण करून दिली पाहिजे. शहराच्या प्रथम नागरिक म्हणून सभागृहात महापौर सर्वोच्च असतात. त्यांचा सन्मान ठेवणे ही प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे. हा सन्मान त्या पदाचा असतो. महापौर हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविताना त्यांनीदेखील पक्षभेद न करता सर्व सभासदांना संधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सभागृहात नव्याने येणाऱ्या सदस्यांची संख्या मोठी असल्याने सभागृहाची परंपरा, संकेत यांचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले, महापालिकेच्या सभागृहात नव्याने आलेल्या सदस्यांची संख्या मोठी आहे. सर्वसाधारण सभेत काम करताना कोणते संकेत असतात, विषय कसा मांडायचा याबाबतचे प्रशिक्षण भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले जाणार आहे. पुढील महिन्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग घेण्याचे नियोजन आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. प्रशासकीय, तसेच संघटनात्मक प्रशिक्षणाचा यात समावेश असेल. तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, महापालिकेची निवडणूक तीन महिन्यांपूर्वी झाली.
भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे. यामध्ये नवीन नगरसेवकांची संख्या मोठी आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत नगरसेवकांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातात. भाजपसह महापालिकेतील सर्वच नगरसेवकांचा प्रशिक्षण वर्ग घेतला जाणार आहे. ‘यशदा’मध्ये हे प्रशिक्षण होईल. त्याचे नियोजन सुरू आहे. सभागृहातील संकेत, महापौरांशी कसे बोलावे, विषय मांडताना कशावर भर असला पाहिजे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भाजपच्या नगरसेवकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये करण्याचे नियोजन आहे.
