पुणे : महापालिकेत निधी वाटपावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील सदस्यांमध्ये सुरू असलेला वाद अखेर मिटल्याचे संकेत मिळाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महापालिकेत तैलचित्र लावले जाणार आहे. यानिमित्त या दोन्ही पक्षांतील वाद संपुष्टात आल्याचे पहायला मिळाले.

केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहेत. पुणे महापालिकेत भाजपनंतर सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे असल्याने विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, असे असले, तरी राज्यात मित्रपक्ष असल्याने विरोधी पक्ष असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी सभागृहात एकत्रित निर्णय घेत होते.

गेल्या महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कामांची चौकशी करण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्यानंतर भाजपने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बालवडकर यांचे बजेट शून्य करण्याचा प्रस्ताव मतदानाच्या जोरावर मान्य करून घेतला. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत बालवडकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदन देणारे सुहास टिंगरे यांचा निधीदेखील शून्य करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करून घेतला. यावरून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र महापालिकेत लावण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. त्या संदर्भात मंगळवारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक महापालिकेत पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे दोन्ही शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम, महापौर मंजूषा नागपुरे आणि सभागृहनेते गणेश बिडकर उपस्थित होते. अजित पवार यांच्या तैलचित्रानिमित्त दोन्ही पक्षांमधील संबंध पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, केंद्रात, राज्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र काम करीत आहे. महापालिकेत काम करताना मतभेद असू शकतात, मनभेद नाही. पुणेकरांनी विकासासाठी निवडून दिले आहे. पुणेकरांच्या विकासासाठी एकत्रित काम केले जाईल.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे म्हणाले, महापालिकेत अजित पवार यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. त्यासाठी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी महापालिकेत बोलाविले होते. या चर्चेत दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी राज्य पातळीवरील नेत्यांवर टीका करायची नाही, असे ठरविण्यात आले. निधी वाटपाबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल.