पुणे : पुणे महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षांचा बहुचर्चित अर्थसंकल्प येत्या सोमवारी (९ मार्चला) सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर करणार असून हा अर्थसंकल्प किती कोटींचा असेल तसेच यामध्ये कशावर भर असणार आहे? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महापालिकेत गेले चार वर्षापासून असलेले प्रशासकराज संपुष्टात येऊन नवीन सभागृह अस्तित्वात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला स्थायी समितीसमोर अंदाजित अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. आयुक्तांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन त्यामध्ये इतर तरतुदींचा समावेश करुन स्थायी समिती अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवून त्याला अंतिम मंजुरी घेईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु केली जाईल.

महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांची निवड झाली. मात्र महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीची निवडणूक न झाल्याने अर्थसंकल्प सादर करण्यासाठी काही दिवस विलंब झाला. गेल्या महिन्यात स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची निवड झाली असून स्थायी समितीच्या दोन बैठका देखील झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्त नवल किशोर राम २०२६-२७ वर्षासाठीचा अर्थसंकल्प कधी सादर करणार, याबाबत उत्सुकता होती.

स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ९ मार्च हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नगरसचिव कार्यालयाला पत्र पाठविले आहे. सोमवारी (२ मार्चला) नगरसचिव कार्यालयाकडे अर्थसंकल्प सादर करण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार ९ मार्चला दुपारनंतर स्थायी समितीची विशेष बैठक होणार असून त्यामध्ये आयुक्त राम अर्थसंकल्प मांडणार आहेत.

महापालिकेच्या विविध विभागांकडून खर्चाची माहिती घेऊन पालिका आयुक्तांनी १५ जानेवारी पर्यंत अर्थसंकल्प तयार करून तो स्थायी समिती समोर मांडावा. त्यानंतर स्थायी समितीने त्याचा अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टींचा समावेश करत हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत ठेवावा. सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर सर्वपक्षीय सभासदांची चर्चा होते. त्यावर आवश्यक त्या उपसूचना देऊन अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्प ठरवून दिलेल्या मुदतीत मांडण्याची परंपरा विस्कळीत झाली आहे. यंदाच्या वर्षीही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमुळे अर्थसंकल्प मांडण्यास उशीर झाल्याचे चित्र आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अर्थसंकल्प स्थायी समिती समोर मांडल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असलेले बदल करत नवीन योजनांचा समावेश करत स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा अर्थसंकल्प महापालिकेच्या मुख्य सभेला सादर करण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्प ओलांडणार १३ हजार कोटींचा टप्पा ?

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम करणारे राजेंद्र भोसले यांनी मागील वर्षी साडेबारा हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा यामध्ये आयुक्त नवल किशोर राम वाढ करण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा साई समिती देखील यामध्ये काही कोटींनी वाढ करणार असल्याने हा अर्थसंकल्प 13 हजार कोटींच्या पुढे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.