पुणे : भाजपने महापालिका निवडणुकीत ‘संकल्पपत्र’ या नावाने सादर केलेल्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकाधारकांना मिळकतकरात माफी देण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भाजपने संकल्पपत्रातील हा ‘शब्द’ फिरविला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५०० फुटापर्यंतच्या सदनिकाधारकांना मिळकतकरात माफी देण्याऐवजी महिलांच्या मालकीच्या मिळकतीला अवघी ५० टक्के करसवलत देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांना भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता देणाऱ्या पुणेकरांना भाजपने निराश केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भाजपने जाहीरनाम्यात याबाबतचे आश्वासन दिले होते. मात्र, काँग्रेसने स्थायी समितीत हा प्रस्ताव देऊन भाजपची अडचण केली. हा प्रस्ताव मंजूर केल्यास त्याचे श्रेय काँग्रेसला जाईल आणि निर्णय न घेतल्यास भरघोस मते देणाऱ्या पुणेकरांची नाराजी पत्करावी लागेल, अशा कोंडीत सापडलेल्या भाजपने मध्यममार्ग स्वीकारला. ५०० चौरस फुटाच्या सदनिकाधारकांना मिळकत करात माफी देण्याऐवजी महिलांच्या मालकी हक्काला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या मालकीच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना ५० टक्के मिळकतकर माफी देण्याची योजना अंदाजपत्रकात जाहीर केली आहे. मात्र, ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी झालेल्याच महिलांच्या मालमत्तांना ही सवलत मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांना दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्षात भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या सरसकट करमाफीच्या आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याचे दिसून आले आहे.
४ लाख ४३ हजार मालमत्ता
शहरात पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींची संख्या ४ लाख ४३ हजार ५५३ आहे. या मिळकतींना सवलत दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने प्रशासनानेही नकारात्मक प्रतिसाद दिला होता. प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिल्याने भाजपने ही योजना न राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुणेकरांचा रोष कमी करण्यासाठी महिलांच्या मालकीच्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना ५० टक्के मिळकत करमाफी देण्याची योजना आणली आहे.
ज्येष्ठ नागरिकांचीही निराशा
‘संकल्पपत्रा’त भाजपने विविध २२ आश्वासने दिली आहेत. त्यामध्ये ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत ‘पीएमपी’ बस प्रवास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आहे. मात्र, त्याबाबतीतही भाजपने ज्येष्ठ नागरिकांची निराशा केल्याचे स्पष्ट झाले आहे. अंदाजपत्रकात शहरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘पीएमपी’च्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
संकल्पपत्रातील ‘या’ आश्वासनांचा अंदाजपत्रकात समावेश
- ‘भारत मंडपम’च्या धर्तीवर पुण्यात अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणार.
- खडकवासला ते खराडी या नव्या मार्गाचा विस्तार पुणे विमानतळापर्यंत करणार.
- पुणे शहर व परिसरातील जांभूळवाडी, कात्रज, पाषाण आणि लोहगाव या तलावांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करून पुणे शहराला ‘लेक सिटी’ म्हणून विकसित करणार.
