पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात उड्डाणपूल, भुयारीमार्ग, बोगदे प्रस्तावित करण्यात आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुमारे ५४ किलोमीटर लांबीचे भुयारी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात येरवडा ते कात्रज हा १४.५ किलाेमीटर लांबीचा ट्विन टनेल बांधण्यात येणार आहेत.

शनिवारवाडा ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहराच्या विकास आराखड्यातील चार बोगद्यांपैकी दोन बोगद्यांचे काम प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे. त्यामध्ये कोथरूड-पाषाण आणि हिंगणे-धनकवडी या दोन बोगद्यांच्या कामांचा समावेश आहे. त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच हे काम सुरू होणार आहे.

घोरपडी रेल्वे पूल, आगाखान पॅलेस येथील नदीवरील पूल, सनसिटी-कर्वेनगर नदीवरील पूल, साधू वासवानी पूल आणि विश्रांतवाडी उड्डाणपूल हे प्रकल्प लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहेत. शास्त्रीनगर उड्डाणपूल, बिंदूमाधव ठाकरे चौक उड्डाणपूल, सेनापती बापट चौक उड्डाणपूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नवीन उड्डाणपूल

मुंढवा-खराडी उड्डाणपूल, शिवणे-नांदेड सिटीला जोडणारा पूल, चांदणी चौक ते भूगाव उड्डाणपूल, साखर संकुल येथील गणेशखिंड रस्त्यावरील भाऊसाहेब खुडे चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकादरम्यान उड्डाणपूल, खडकी छावणी हद्दीतील रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण हे प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे.मार्केटयार्ड बस डेपो ते वर्धन चौकादरम्यान उड्डाणपुलाचे (गंगाधाम चौक) लवकरच सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर काम सुरू केेले जाणार आहे.

‘पीपीपी’ तत्त्वावर बहुमजली वाहनतळ

शहराच्या विकास आराखड्यात पार्किंगसाठी आरक्षित जागांवर ‘पीपीपी’ तत्त्वावर वाहनतळ सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. अस्तित्वातील वाहनतळ हे बहुमजली करण्याचे नियोजित आहे. आवश्यकतेनुसार ते ‘पीपीपी’ तत्त्वावर विकसित केले जाणार आहेत. पार्किंग वॉर्डन नियुक्त करणे, पार्किंग व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी आरक्षणांचे ‘जीआयएस’ मॅपिंग करण्यात येणार आहे.