पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये काही वर्षांपूर्वी पावणेदोन कोटी रुपये खर्च करून उभारलेली अग्निशामक यंत्रणा नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली. अनेक कार्यालयांत ‘स्मोक डिटेक्टर’, ‘स्प्रिंकलर’, सेन्सर काम करीत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार पुणे शहरात आज, बुधवारी मॉक ड्रिल होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्या कार्यालयांची मंगळवारी तपासणी केली. मात्र, त्यात महापालिका नापास झाली आहे.
मुंबईत मंत्रालयामध्ये काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे राख झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा कार्यान्वित करण्याचा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने २०१२ मध्ये महापालिका भवन या मुख्य इमारतीसह, महापालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालये, सांस्कृतिक भवन येथे कोट्यवधी रुपये खर्च करून अग्निशामक यंत्रणा उभारली. यामध्ये स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर, सेन्सर बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या सावरकर भवन येथे काही दिवसांपूर्वी एका कार्यालयात आग लागल्यानंतर तेथे असलेली अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित झाली नव्हती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने ही यंत्रणा दुरुस्त केली.
महापालिका प्रशासनाने मुख्य इमारतीसह अन्य वास्तूंच्या सुरक्षेचा आढावा घेतला. यात महापालिका भवनमधील अग्निशामक यंत्रणेत त्रुटी दिसली. इमारतीच्या सर्व पॅसेजमध्ये सेन्सरवर आधारित सुरू होणारे स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश कार्यालयांत ते बसविण्यात आलेले नाहीत. दहा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेली ही यंत्रणा वापरण्याची गरज पडली नाही. अनेक कार्यालयांत डागडुजी, नूतनीकरणाची कामे करताना सेन्सर तुटल्याचे समोर आले आहे. बालगंधर्व रंगमंदिरातील अग्निशामक यंत्रणेमध्येही अशाच अडचणी आल्याचे समोर आले आहे.
महापालिका भवन आणि बालगंधर्व रंगमंदिर येथील अग्निशामक यंत्रणा दुरुस्तीसाठी पावले उचलण्यात येत आहेत. पालिकेच्या रुग्णालयांबरोबरच, शाळा आणि सांस्कृतिक भवनमधील अग्निशामक यंत्रणांची दर सहा महिन्यांनी ऑडिट करून देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका