पुणे : जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीसाठी आज (गुरुवारी) १६ एप्रिलला पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने मागे घेतला आहे. त्यामुळे शहरातील सर्व भागात नियमीत पाणी मिळणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता. मात्र शहराच्या काही भागात टॅंकर चालकांनी पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात बुधवार सकाळपासून बंद पुकारला आहे. यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळालेले नाही.

महापालिकेने गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता होती. महापालिकेने गुरुवारी पाणी बंद ठेवल्यास पुणेकरांना ऐन उन्हाळयात सलग दोन दिवस पाणी मिळणार नाही. त्यामुळे महापालिकेकडून गुरूवारचा पाणी बंद मागे घेण्यात आला आहे. गुरुवारी संपूर्ण शहरात नियमित पाणी येणार आहे. तसेच, देखभाल दुरूस्तीची कामे पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठी पाणीबंदची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी कळविले आहे.

पुणे शहर वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाने काही भागातील टँकर चालकांवर कारवाई करण्याची कठोर भूमिका घेतली आहे. टँकरचालकांवर दंडात्मक कारवाई करुन वाहतूक पोलीस दीड ते दोन हजार रुपयांचा दंड त्यांच्याकडून आकारत असल्याचा आरोप टँकर चालक संघटनेकडून केला जात आहे. पोलीसांना सुरु केलेल्या कारवाईच्या विरोधात टँकर चालकांनी संप पुकारला आहे.

या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये प्रस्तावित बंदाच्या पुढील तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमित न होता अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी महापालिकेने पाणीबंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू राहणार असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.