पुणे : पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने महापालिकेतील अनेक कामे ठप्प झाली आहेत. आचारसंहिता लागू झाल्याने नव्याने कोणत्याही निविदा काढता येत नसताना महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाने नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील कामे अत्यावश्यक असल्याचे दाखवून चक्क निविदा काढल्या आहेत.

प्रभाग क्रमांक १३ ड, पुणे स्टेशन, जय जवाननगर परिसरातील चेंबर उचलणे, पादचारी मार्ग दुरुस्त करणे, सांडपाणी वाहिनी दुरुस्त करणे या कामांसाठी सुमारे एक कोटी ४० लाख रुपयांच्या १७ निविदा काढल्या आहेत. आचारसंहिता सुरू असल्याने ही कामे करण्यावरून प्रशासनामध्येच मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. नगरसेवकाच्या स यादीसाठी ठेवण्यात आलेल्या निधीतून निविदा काढण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गेल्या आठवड्यात पुणे विभागातील पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आचारसंहिता सुरू झाली. परिणामी, शहरातील अनेक कामांवर बंधने आली. आचारसंहितेमुळे महापालिकेला नवीन कामांबाबत निर्णय घेणे आणि त्याची प्रक्रिया करता येत नसल्याने अनेक खात्यांची कामे लांबणीवर गेली आहेत. नगरसेवकांच्या ‘स’ यादीतून केल्या जाणाऱ्या कामांनाही आचारसंहितेचा फटका बसला आहे.

महापालिकेच्या परिमंडळ एक मधील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक १३ डमधील ‘स’ यादीतील कामांसाठी निविदा काढल्या. विशेष म्हणजे यामध्ये चेंबरची दुरुस्ती, शौचालयाची दुरुस्ती, मोठ्या व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकणे, पावसाळी चेंबर व पाइपची स्पायडर मशीन, जेटिंग मशीन आणि ग्रॅब मशीनद्वारे साफसफाई करणे, पादचारी मार्ग दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.

या सर्व कामांसाठी संबंधित कंत्राटदाराकडे स्वतःची यंत्रसामग्री आणि दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असल्याची अटही घालण्यात आली आहे. या १७ कामांसाठी एक कोटी ४० लाख ९५ हजार ८९१ रुपये खर्च केला जाणार आहे.

महापालिकेच्या परिमंडळ १ च्या उपायुक्त आशा राऊत यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘प्रभाग क्रमांक १३ ड मध्ये पथ आणि मलनिःसारण विभागातील देखभाल-दुरुस्तीसाठी अत्यावश्यक कामे होती. निवडणूक शाखेकडे विचारणा केल्यानंतरच ही निविदा काढण्यात आली.’

महापालिकेचे निवडणूक शाखेचे उपायुक्त प्रसाद काटकर म्हणाले, ‘आचारसंहितेत देखभाल-दुरुस्तीची आणि अत्यावश्यक कामे करता येतात. मात्र, ही कामे नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील असल्याने आचारसंहितेत ती न करता नंतर करणे योग्य ठरले असते. मुख्य खात्याच्या निधीतूनदेखील ही कामे होऊ शकतात.’