पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळविला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या. येरवडा येथील एका प्रभागातून काँग्रेसने चारही जागांवर विजय मिळविला आहे.

केंद्रात, राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने महापालिकेत भाजपला सत्ता द्यावी असे आवाहन करत भाजपा नेत्यांकडून प्रचार केला जात होता. त्यातच काँग्रेसचा ‘ हात ‘ सोडून अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले असल्याने मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा राहिली होती. महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने ही लढाई अवघड झाली होती.

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख कोथरूड विधानसभा मतदार संघाची आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह राज्यसभेचा खासदार मेधा कुलकर्णी या कोथरूड मधून प्रतिनिधित्व करतात. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड भागातून काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवित महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धक्का दिला आहे. याची पावती म्हणून महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेतेपद कोथरूडला देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी रामचंद्र ऊर्फ चंदू कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले कदम कोथरूड येथील प्रभाग क्रमांक ११, रामबाग काॅलनी-शिवतीर्थनगर या भागातून निवडून आलेले आहेत. याच भागातून काँग्रेसचे तिकिटावर आणखी एक उमेदवार विजयी झाला आहे.

काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे १५ सदस्य विजयी झाले आहेत. या सर्व नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीत कदम यांची महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने, तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाचे पुण्याचे निरीक्षक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची स्वतंत्र भेट घेऊन गटनेता पदासाठीचा कल घेतला होता. त्या वेळीच कदम यांच्या नावास एकमताने संमती मिळाली होती. निवडीनंतर चंदूशेठ कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमवेत विभागीय आयुक्तांकडे जाऊन पत्र दिले आहे.

कदम हे माजी मंत्री विश्वजित कदम यांचे नातेवाईक आहेत. कोथरूड भाग हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत आहे. या भागातून कदम हे तीनदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. २०१७ आणि २०२६ मध्येदेखील ते याच परिसरातून निवडून आले आहेत.