पुणे : गणेशोत्सवासाठी नदीपात्रासह, महापालिकेच्या मोकळ्या जागांवर आणि शाळांच्या मैदानांवर ढोल-ताशा पथकांनी सराव करण्यास सुरुवात केली आहे. या बाबत काही तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे या पथकांना जागा देण्याबाबतची नियमावली तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पुणे शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. ढोल-ताशांसह लेझीम, टिपरी, झांजा, शंखनाद अशा विविध पथकांचे सादरीकरण होते. यासाठी ही पथके गणेशोत्सवापूर्वी शहरातील विविध भागांत सराव करतात. यामध्ये प्रामुख्याने नदीपात्रातील जागा, महापालिकेच्या मालकीची मोकळी मैदाने यावर हा सराव चालतो. अनेकदा रस्त्याच्या कडेलादेखील काही पथके सराव करतात.

निवासी भागाजवळ वादनाचा सराव झाल्यास त्याचा त्रास नागरिकांना आणि स्थानिक रहिवाशांना होतो. ढोल-ताशा वादक पथकांनी काय काळजी घ्यावी, कोणाची परवानगी घ्यावी, कोणत्या वेळेत सराव करावा, किती वेळ सराव करावा, या बाबत नियमावली तयार करण्याचे काम महापालिका प्रशसनाने सुरू केले आहे. यासाठी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन, शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या उपायुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

या माहितीवरून महापालिका प्रशासन नियमावली तयार करणार असून, त्या नियमांचे पालन करण्याचे बंधन ढोल-ताशा पथकांवर असणार आहे. या पथकांना महापालिकेने घालून दिलेली नियमावली नुसार सराव करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी ढोल ताशा पथकांनी नदीपात्रात सराव करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

गेल्या आठवड्यात पुणे शहरासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नदीपात्रात पाणी आले होते. डेक्कन जिमखाना आणि पेठ परिसरांना जोडणारा बाबा भिडे पूल पाण्यात गेला होता. नदीकाठच्या रस्त्यावर पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथेच काही पथकांनी सराव सुरू केला असल्याची माहिती समोर आली होती.

महापालिकेच्या मालकीच्या जागांवर कोणतीही परवानगी न घेता काही ढोल-ताशा पथके परस्पर सराव सुरू करतात. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडते. राजकीय पक्षांच्या मर्जीतील ढोल-ताशा पथके अनेकदा बिनधास्तपणे सराव सुरू करीत असल्याचेही प्रकार प्रशासनाच्या लक्षात आले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही नियमावली मार्गदर्शक ठरणार आहे. पथकांनी कोठे सराव करावा, याच्या जागाही यानिमित्ताने निश्चित होणार असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगतिले.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले, ढोल-ताशा सराव पथकांबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे ठेवला जाणार आहे. त्यामध्ये विविध बाबींचा समावेश असणार आहे. आयुक्तांच्या मान्यतेनंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल. अद्याप महापालिकेने कोणत्याही ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिलेली नाही.