पुणे : पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महापालिकेच्या सुमारे १८ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यासह विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ११ हजार कंत्राटी कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगारांनाही दिवाळीपूर्वी आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थायी समितीच्या निर्णयानुसार, नियमित कर्मचाऱ्यांना वेतनाच्या ८.३३ टक्के रकमेबरोबरच २७ हजार रुपये अतिरिक्त सानुग्रह अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे, या अतिरिक्त अनुदानात दरवर्षी दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, २०२९-३० या आर्थिक वर्षात ही अतिरिक्त रक्कम ३५ हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली.

महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी, रोजंदारीवरील कामगार, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच बालवाडी शिक्षिका आणि सेविका यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या बक्षिसाचाही प्रश्न स्थायी समितीने मार्गी लावला आहे. सुमारे ११ हजार कंत्राटी कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय उपसूचनेद्वारे घेण्यात आला. या निर्णयासाठी महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे ११ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत यापूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला होता. त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. नियमित कर्मचाऱ्यांच्या बोनसबरोबरच कंत्राटी कामगारांनाही दिवाळीचा लाभ मिळावा, यासाठी बक्षिसाची तरतूद करण्यात आली आहे.

स्थायी समितीच्या मान्यतेनंतर आता या प्रस्तावाला मुख्य सभेची अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. मात्र मुख्य सभा मान्यता देईल त्या भरवश्यावर याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

असा आहे बोनस आणि बक्षिस

  • १८ हजार – महापालिका अधिकारी व कर्मचारी
  • ८.३३ टक्के – वेतनाच्या प्रमाणात सानुग्रह अनुदान
  • २७ हजार रुपये – अतिरिक्त अनुदान
  • २ हजार रुपये – दरवर्षी अतिरिक्त अनुदानातील प्रस्तावित वाढ
  • ३५ हजार रुपये – २०२९-३० मधील अतिरिक्त अनुदान
  • ११ हजार – कंत्राटी कामगार
  • १० हजार रुपये – प्रत्येक कंत्राटी कामगाराला बक्षीस
  • ११ कोटी रुपये – कंत्राटी कामगारांच्या बक्षिसापोटी अपेक्षित खर्च