पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये सांडपाणी वाहिन्या तुंबणे, रस्त्यावर सांडपाणी वाहणे, सोसायट्यांच्या आवारात घाण पाणी शिरणे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणे, हे चित्र पाहायला मिळते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटारे आणि सांडपाणी वाहिन्या स्वच्छ केल्याचे दावे महापालिका प्रशासनाकडून केले जात असले, तरी प्रत्यक्षात पहिल्याच पावसात प्रशासनाने केलेल्या या दाव्यांतील फोलपणा उघड झालेला दिसतो. कर्वेनगर, सिंहगड रस्ता, कोथरूड, वारजे, धायरी, हडपसर, कोंढवा, कात्रज, बाणेर, बालेवाडी, विमाननगर, खराडी, औंध, पाषाण, येरवडा, विश्रांतवाडी, धनकवडी, सहकारनगर, दत्तवाडी, एरंडवणे, पर्वतीसह अनेक भागांमध्ये पाऊस झाला, की ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात.
रस्त्यावर साचलेले सांडपाणी, उघडी पावसाळी गटारे (मॅनहोल) आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून सध्या प्रवास करावा लागतो. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेली पावसाळी गटारे (स्टॉर्म वॉटर ड्रेन्स) वर्षानुवर्षे गाळ, प्लास्टिक, कचरा आणि बांधकामातील राडारोड्याने भरून गेलेली आहेत.
पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील या गटारांची स्वच्छता वेळेत आणि शास्त्रीय पद्धतीने होत नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या वाहिन्यांमध्ये सांडपाण्याचे बेकायदा जोड दिल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. झपाट्याने वाढलेल्या शहरीकरणामुळे आणि नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे विद्यमान ड्रेनेज यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
अनेक दशकांपूर्वीच्या क्षमतेनुसार उभारण्यात आलेल्या सांडपाणी वाहिन्या आजच्या लोकसंख्येचा आणि पावसाचा भार पेलू शकत नाहीत. नव्या इमारती उभ्या राहत असताना ड्रेनेज नेटवर्कचा विस्तार मात्र अपेक्षित वेगाने झालेला नाही. परिणामी, वाहिन्या वारंवार तुंबून सांडपाणी घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये आणि व्यावसायिक संकुलांमध्ये घुसते.
महापालिका दर वर्षी पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज आणि पावसाळी गटारे स्वच्छ करण्यासाठी मोठा निधी खर्च करते. मात्र प्रत्यक्षात ही कामे केवळ कागदावर झाली का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक भागांमध्ये गाळ पूर्णपणे काढला जात नाही, तर काही ठिकाणी गाळ रस्त्याच्या कडेलाच टाकून दिला जातो. त्यामुळे तो पुन्हा गटाऱ्यात जाऊन समस्या कायम राहते. केवळ गटारे स्वच्छ करून ही समस्या सुटणार नाही.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार संपूर्ण सांडपाणी व्यवस्थेचे पुनर्रचना करणे आवश्यक आहे. जुन्या, अरुंद आणि निकृष्ट क्षमतेच्या सांडपाणी वाहिन्या बदलून मोठ्या क्षमतेच्या वाहिन्या टाकणे, पावसाच्या पाण्याच्या गटाऱ्यांचे आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांचे पूर्णपणे विभाजन करणे, अतिक्रमणे हटविणे आणि आधुनिक यंत्रणेद्वारे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. हीच पुणेकर नागरिकांची अपेक्षा आहे. पुणे महापालिकेचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजरे म्हणाले, सांडपाणी वाहिन्यांना पावसाळी गटारांच्या वाहिन्या जोडल्याचे प्रकार शहरातील काही भागांमध्ये झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्यावर ताण येतो. पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी झाल्याने ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडतात. ज्या ठिकाणी उताराचा भाग अधिक आहे, प्रामुख्याने त्या भागात ही समस्या अधिक जाणवते. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बांधकामांमुळेही अस्तिवात असलेल्या ड्रेनेज व्यवस्थेवर ताण वाढतो.
