यंदाच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप कडून महापौरपदासाठी मुक्ता टिळक, शिवसेनेकडून नगरसेविका संगीता ठोसर आणि काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी करत महापौरपदासाठी नंदा लोणकर यांनी अर्ज भरला आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून नवनाथ कांबळे, शिवसेनेकडून विशाल धनवडे आणि आघाडीमार्फत लता राजगुरू यांनी अर्ज सादर केला आहे. या दोन्ही पदासाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवार देण्यात आले आहे. तसेच आज झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माघार घेतल्याने तिथे निवडणूक बिनविरोध झाली. पुण्यात देखील त्याची पुनरावृत्ती होणार का ? अशी चर्चा शहरात ऐकण्यास मिळत असून या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत दिल्याने महापौरपदाच्या उमेदवार मुक्ता टिळक या विजयी होणार हे निश्चित मानले जात आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजपचे १६२ पैकी ९८ नगरसेवक निवडून आले असून या आकडेवारीवरून भाजपचा महापौर आणि उपमहपौर होणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी -काँग्रेसने उडी घेतली असून उद्या सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव काम करणार आहेत. या निवडणुकीच्या वेळी माघार घेण्यास काही वेळ दिला जातो. त्या दरम्यान शिवसेना माघार घेण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने साथ दिल्याने पुण्यात शिवसेना भाजपला साथ देण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही अस्तित्वासाठी निवडणूक लढवेल. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाला सर्वाधिक फटका बसला असून त्यातून हा पक्ष सावरत नाही. तोवर महापालिका निवडणुकीत देखील राष्ट्रवादी – काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर त्यात आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने उद्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



