पुणे : ‘महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदारयादीमध्ये अनेक चुका असून, एका भागातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात दाखविण्यात आली आहेत. या चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेण्यात येऊ नये,’ अशी मागणी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
‘महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या मतदारयादीत तीन लाखांपेक्षा अधिक मतदारांची दुबार नोंदणी झाल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीच दिली आहे. प्रभागांची प्रारुप मतदारयादी तयार करताना त्यामध्ये इतर प्रभागातील मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत. या सर्व प्रकारामुळे महापालिका प्रशासन राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याची शंका विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.
मतदारयादीत अनेक त्रुटी असतानाही महापालिकेने प्रारुप मतदारयादीवर हरकती नोंदवण्यासाठी केवळ ८ दिवसांचा कालावधी देण्यात आला. चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेली मतदारयादी पुढे तशीच रेटून आगामी निवडणुका घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे,’ असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे.
‘महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीतील त्रुटी दूर केल्या जात नाही, तोपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये,’ अशी मागणी करून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, समाजावादी पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
‘खडकी कँन्टोन्मेंट’मधील नागरिकांची नावे मतदारयादीत
‘निवडणुकीसाठी प्रारुप मतदारयादी तयार करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केलेली नाही, त्यामुळे अनेक त्रुटी राहिल्या,’ असा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम यांनी केला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे महानगरपालिका, खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचा भाग समाविष्ट आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ (गोखलेनगर-वाकडेवाडी) या प्रभागाची प्रारुप मतदारयादी तयार करताना खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या परिसरातील इंदिरा झोपडपट्टीतील शिवाजीनगर विधानसभा यादी भाग क्रमांक ८२ मधील संपूर्ण नावे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप निकम यांनी केला.
‘महापालिकेच्या हद्दीत राहत नसलेल्या नागरिकांना पुणे महानगरपालिकेचे मतदार बनविण्याचा प्रयत्न प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी चूक होणे शक्य नाही. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या अनुषंगाने तातडीने कारवाई करावी. याबरोबरच ‘प्रभाग क्रमांक ७ मधील मतदारयादीमधून खडकी कॅन्टोमेंट बोर्डातील एकाच यादीतील १ हजार २११ मतदारांची नावे वगळण्यात यावी,’ अशी मागणी निकम यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
