पुणे : महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्यात आल्यानंतरही पुणेकरांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने धक्का बसला. जोमाने प्रचार करणारे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांचे महापालिकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यास फटका बसण्याच्या शक्यतेने भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा भाजपला झाला. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळविला होता. मात्र, या जागा राखण्यात ‘राष्ट्रवादी’ला अपयश आले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘राष्ट्रवादी’ची ताकद वाढविण्यासाठी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. महापालिका निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सत्तेत सहभागी असतानाही स्वबळावर निवडणूक लढविताना एकमेकांवर टीका न करण्याचा निर्णय भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी घेतला होता. मात्र, प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर पहिले दोन दिवस महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर कोणतीही टीका टीपण्णी केली नाही. मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले. त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या कारभारावर टीका करण्यास सुरुवात केली. महापालिकेतील कारभारी बदला, अशी साद मतदारांना घातली.
पवार यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांसह राज्य पाचळीवरील नेते देखील त्रस्त झाले. पवार यांनी जाहीर सभा, रॅली काढल्याने वातावरण निर्मिती झाली. त्यामुळे भाजपपुढे आव्हान उभे राहिले. आता निकालानंतर ‘राष्ट्रवादी’ला फटका बसला आहे.
