पुणे : महापालिकेची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ च्या नुसार ही निवडणूक घ्यावी लागणार असून, चार सदस्यांचा प्रभाग याप्रमाणे निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आल्याने नव्याने प्रभागरचना करून निवडणूक होईल, की आहे त्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होण्यावरून संभ्रम निर्माण आहे.
पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात येऊन तीन वर्षे झाली असून, महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची अखेरची निवडणूक ज्या पद्धतीने घेण्यात आली, त्यानुसार घेण्याचे न्यायालयाच्या सूचना असल्याने २०१७ मध्ये झालेल्या चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने पुणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या हद्दीत नव्याने गावांचा समावेश झाल्यानंतर महापालिकेची हद्द आणि लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्याही वाढणार असल्याचे निश्चित होते. त्यानुसार नव्याने प्रभागरचना तयार करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी काही दिवस राज्य सरकराने उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे महापालिका हद्दीतून वगळून तेथे स्वतंत्र नगर परिषद केली आहे. ही गावे महापालिकेतून वगळल्याने नव्याने प्रभागरचना करावी लागण्याची शक्यता आहे. नवीन प्रभागरचना करायची झाल्यास त्याची प्रसिद्धी, हरकती, सूचना त्यावर सुनावणी यामध्ये वेळ लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर महापालिकेची निवडणूक घ्यायची झाल्यास कशी घ्यायची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत तीनऐवजी चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे निश्चित असल्याचे महापालिकेतील निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. या वेळी सदस्यांची संख्या १६२ होती. यामध्ये अनुसूचित जातीसाठी २२, अनुसूचित जमातीसाठी २, इतर मागासवर्गासाठी ४४, सर्वसाधारण गटाचे ९४ सदस्य होते.
महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
भाजप ९७
राष्ट्रवादी काँग्रेस ३९
शिवसेना १०
काँग्रेस ०९
मनसे ०२
अपक्ष ०४
एमआयएम ०१