Pune Thane Civic Poll Results 2026: महिलांना राजकारणात काम करण्याची संधी मिळावी, समाजातील विविध घटकांमधील प्रश्न त्यांना समजावे, तसेच महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र महिला उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांचे पती, भाऊ तसेच कुटुंबातील व्यक्तीच सर्व कारभार चालवीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद असो अथवा महानगरपालिका यामध्ये राज्य सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. महिलांना त्यांचे निर्णय स्वतः घेता यावे, त्यांना काम करण्याची संधी मिळावी, यासाठी महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. मात्र याकडे अनेक जण राजकीय सोय म्हणून बघत असून आरक्षित जागेवर महिलेला निवडणुकीसाठी उभे करून तिचा विजय झाल्यानंतर तिचा कारभार कुटुंबातील पुरुष मंडळीच हातात घेत असल्याचे प्रकार आजही सुरूच आहेत.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. १६५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये महिलांना ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत महिलांसाठी राखीव असलेल्या जागांव्यतिरिक्त खुल्या गटातील जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात पुरुषांपेक्षा महिला सदस्यांची संख्या अधिकच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने विविध राजकीय पक्षांनी त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली. अनेक ठिकाणी उमेदवारी दिलेल्या महिला निवडून देखील आल्या आहेत. मात्र, या महिला सभासदांचे (नगरसेविकांचे) पती हेच त्यांचा कारभार पाहणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या एका महिला नगरसेविकेच्या पतीने महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्याची चर्चा आहे.

या बैठकीची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली. यामुळे शहरातील इतर भागांतून विजयी झालेल्या महिला सदस्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच आता महापालिकेचा कारभार चालविणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी देखील महापालिकेत निवडून आलेल्या महिला नगरसेविकांच्या पदाचा फायदा घेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्याचे प्रकार घडले होते.

महापालिकेच्या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सभागृहामध्ये महिला सदस्यांची संख्या पुरुष सभासदांपेक्षा अधिक आहे. यंदाच्या वर्षी ९१ महिला सदस्य महापालिकेत सभासद म्हणून काम पाहणार आहेत. विकासाला गती मिळावी, केवळ चूल आणि मूल यामध्ये अडकून न पडता महिलांना राजकीय, सामाजिक जीवनात निर्णय घेण्याची संधी मिळावी, नागरिकांचे प्रश्न सुटावेत, या हेतूने निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील एका प्रभागातून विजयी झालेल्या नगरसेविकेच्या पतीने नुकतीच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी संंबंधित नगरसेविका देखील उपस्थित होत्या. या बैठकीत त्यांच्या पतीनेच अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारल्याची चर्चा आहे. या भागातील स्वच्छतेचे काम कोणत्या संस्थांना दिले आहे, त्यांंच्याकडून कुठल्या सोसायट्यांमधील कचरा उचलला जातो याबाबत विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे.

ही माहिती मला तत्काळ मिळाली पाहिजे, अशी तंबीही संबंधित नगरसेविकेच्या पतीने दिली. संबंधित नगरसेविका वाघोली परिसरातून विजयी झाल्याची चर्चा आहे. हे प्रकार शहरातील इतर प्रभागांमध्ये देखील घडू शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या निवडून आलेल्या महिला सभासदांना आवश्यक ते मार्गदर्शन करून कुटुंबातील व्यक्तींचा महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.