पुणे : समान पाणी पुरवठा योजनेच्या रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट केल्याने महापालिकेने संबधित ठेकेदाराला १० लाख रुपयांचा दंड केला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष जागा पाहणी केल्यानंतर ही कारवाई केली. धायरी भागात सुरू असलेल्या कामासाठी हा दंड ठोठावण्यात आला.

धायरी येथील उंबऱ्या गणपतीच्या परिसरात दोन महिन्यांपूर्वी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, ठेकेदाराकडे सिमेंट काँक्रिट नसल्याने हा रस्ता न बुजविता तसाच सोडून देण्यात आला. चार दिवसांपूर्वी रात्री सिमेंट काँक्रिट उपलब्ध झाल्याने ठेकेदाराने खोदलेला रस्ता पूर्ववत केला. त्यावरून वाहने जाऊ नयेत, सिमेंट सुकावे यासाठी ठेकेदाराने कोणतीही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे पुढील अवघ्या काही तासांत सिमेंट निघण्यास सुरुवात झाली. या बाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.

या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी रविवारी सकाळी महापालिका आयुक्त राम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी धायरी परिसरातील या कामाची पाहणी केली. त्या वेळी खोदलेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला नसल्याचे समोर आले. गेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध भागात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. काही भागातील काम पूर्ण झाले असून काही भागात हे काम सुरू आहे.

सिमेंट काँक्रिटवर ठेकेदाराने पोते झाकले होते. आयुक्त राम यांच्या समोर हे पोते उचलल्यानंतर कामाची पोलखोल झाली. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी स्वतः सिमेंट काँक्रिटीकरण व्यवस्थित केले नसल्याचे हात लावून पाहिले. त्यानंतर महापालिका आयुक्त राम यांनी जागेवरूनच पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना फोन करून हे काम निकृष्ट झाले आहे. ठेकेदाराला १० लाख रुपयांचा दंड लावा असे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून या भागात हे काम सुरू आहे. मात्र काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रार केली जात होती.

आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. यासाठी रस्ते खोदले जातात. पण, खोदलेले रस्ते योग्य पद्धतीने दुरुस्त करण्याची जबाबदारी संबधित ठेकेदारावर आहे. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने संबंधित ठेकेदाराला १० लाखांचा दंड करण्यात आला आहे. त्याच्याकडून हा रस्ता पुन्हा दुरुस्त करून घेतला जाणार आहे.