पुणे : लाकडामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी गॅस आणि विद्युत दाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसह इतर गावांमध्ये अंत्यंविधी करण्यासाठी गॅसदाहिनी बसविण्यास विरोध होत आहे.
समाविष्ट झालेल्या दोन गावांसाठी गॅसदाहिनी बसविण्यासाठी आवश्यक साहित्याची खरेदी महापालिकेने केली. मात्र, गावातील एका गटाचा त्याला विरोध होत असल्याने गॅसदाहिनी उभारणे अद्यापही महापालिकेला शक्य झालेले नाही. गॅसदाहिनी बसविण्याची मागणी काही नागरिकांनी केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निविदा काढून आवश्यक साहित्याची खरेदी केली. महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अनेक इमारती झाल्या असून, मोठ्या सोसायट्यादेखील या परिसरात उभ्या राहिल्या आहेत. तेथील नागरिकांचा मृत्यू झाल्यास गॅसदाहिनी, विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने येथील रहिवाश्यांना वैकुंठात यावे लागते. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवर ताण वाढत आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत २९ स्मशानभूमी आहेत. यामध्ये एकूण २७ गॅसदाहिन्या आहेत. मात्र, असे असले तरी शहरातील ६० टक्के अंत्यसंस्कार हे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत होतात. नागरिकांना जवळच्या भागात अंत्यसंस्काराची सुविधा मिळावी आणि नागरिकांचा त्रास वाचावा, यासाठी महापालिकेने उपनगरांसह व समाविष्ट गावांमधील स्मशानभूमींमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, तेथे विद्युतदाहिनी अथवा गॅसदाहिनी बसविण्याचेही नियोजन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या खडकवासला, येवलेवाडी, उत्तमनगर या गावांसह कर्वेनगर येथे गॅसदाहिनी बसविण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. या ठिकाणी सध्या लाकडावर अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनीचा प्रकल्प उभारण्यासाठी पुरेशी जागा असल्याने पारंपरिक पद्धतीची व्यवस्था कायम ठेवून केंद्रीय अनुदानातून गॅसदाहिनी बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. एका गॅसदाहिनीसाठी ६५ लाख रुपये आणि चिमणीसाठी १५ लाख रुपयांची निविदा प्रशासनाने मान्य केली. याचे सर्व साहित्य पालिकेकडे आले असून, फक्त दाहिनीची जुळणी करणे शिल्लक आहे.
या गावांतील काही नागरिकांनी याला विरोध केल्याने हे काम रखडले आहे. पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्याबरोबरच ज्यांना गॅस दाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करायचे आहेत, त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाला प्रयत्न असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, गॅसदाहिनी बसविल्यास पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करू दिले जाणार नाहीत, अशी भीती ग्रामस्थांच्या मनात असल्याने याला विरोध होत असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर म्हणाल्या, महापालिकेत समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये अंत्यविधीसाठी गॅसदाहिनी बसविण्यासाठी विरोध होत आहे. गॅसदाहिनीबरोबरच पारंपरिक पद्धतीने दहन सुरूच राहणार आहे. अंत्यसंस्कार कसे करायचे हा निर्णय कुटुंबीयांचा असणार आहे. गॅस दाहिनीतील अंत्यसंस्कार मोफत केले जातात. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी लाकडामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गॅसदाहिनीचा पर्याय स्वीकारावा, यासाठी प्रबोधन केले जात आहे.
