पुणे : रस्ते विकास, देखभाल दुरुस्तीची कामे करताना रस्त्याखालील सेवा वाहिन्यांचे ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’ या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांचा वापर करून सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतरच ठेकेदारांना काम सुरू करता येणार आहे. त्यामुळे रस्त्यांची खोदाई करताना सेवा वाहिन्यांचे नुकसान आणि संभाव्य अपघातही टाळण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.

शहरातील रस्त्यांखालून पाणीपुरवठा, ड्रेनेज, पावसाळी गटारे, ‘एमएनजीएल’च्या गॅस वाहिन्या, महावितरणच्या वीज वाहिन्या, विविध कंपन्यांच्या केबल्सचे जाळे पसरले आहे. रस्त्यांचा विकास अथवा देखभाल दुरुस्तीची कामे करताना अनेकदा जलवाहिनी फुटणे, वीजवाहिन्या तुटण्याच्या घटना घडतात. यामुळे सेवा खंडित होऊन काही वेळा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’ या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांचा वापर करून सर्वेक्षण केल्यानंतरच रस्त्यांची खोदाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्वेक्षण करून घेणे ठेकेदारांना बंधनकारक करण्यात आले आहे.

महापालिकेडे सेवा वाहिन्यांचे नकाशेच नाहीत

महापालिकेकडे सेवा वाहिन्यांचे एकत्रित नकाशे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्त्यांचे काम करत असताना अंदाजे खोदाई करण्यात येते. त्यामुळे सेवा वाहिन्या खंडित होऊन त्याचा परिणाम सेवांवर होतो. त्यामुळे पालिकेच्या पथ विभागाने रस्ते खोदाई करण्यापूर्वी ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’चा वापर करून सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. रस्ते खोदाईची परवानगी मागितली गेल्यानंतर ठेकेदारांना आता सर्वेक्षण करून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, सर्वेक्षणाच्या खर्चाचा अंतर्भाव हा कामाच्या पूर्वगणनपत्रामध्येच करण्याचे आदेश पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.