पुणे : ‘पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गुजर निंबाळकरवाडी येथील काही जणांनी बांधकामे न करता बनावट नकाशांद्वारे ग्रामपंचायतींकडे इमारती आणि बंगले बांधल्याच्या नोंदी केल्या. त्यानंतर त्याचा मिळकतकर लावून घेतला आहे,’ अशी माहिती शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) शहर प्रमुख वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मोरे म्हणाले, ‘गुजर निंबाळकरवाडी हे गाव महापालिकेत समाविष्ट होण्याची कुणकुण लागल्याने येथील ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच यांनी गावांमध्ये २००७ मध्ये तयार केलेले बांधकामांचे नकाशे जोडून रिकाम्या जागांवर निवासी आणि व्यावसायिक इमारती, गाळे उभारल्याचे भासवून ग्रामपंचायतीत मिळकतकर लावून घेतला. ग्रामसेवक आणि इतर सेवकांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. सध्या गुजर निंबाळकरवाडीतील विविध भागांत प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या ३००हून अधिक मिळकती असल्याचे पुरावे महापालिका आयुक्तांना दिले आहेत.’

‘महापालिकेत गाव आल्यानंतर मिळकतकर विभागाने ग्रामपंचायतीकडे असलेल्या ‘८ अ’च्या उताऱ्यावरील सर्व मिळकतींची बिले तयार केली. त्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या या मिळकतींचीही बिले काढण्यात आली. सध्या या मिळकतधारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी दिसत आहे. राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी समाविष्ट गावांतील मिळकतींची थकबाकी वसुलीस स्थगिती दिली असल्याने मिळकतकर विभागाकडून संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आला नाही.

गुजर निंबाळकरवाडीमध्ये अशा प्रकारे मिळकतकर आकारणी केलेल्या ३०० हून अधिक मिळकती आढळून आल्या. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि मिळकतकर विभाग प्रमुख रवी पवार यांच्याकडे केली आहे,’ असे मोरे यांनी सांगितले.

‘गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू’

‘वसंत मोरे यांनी दिलेल्या पुराव्यांनुसार संबंधित मिळकतींची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले आहे. महापालिकेच्या तुलनेत ग्रामपंचायतीचा कर कमी असल्याने गाव महापालिकेत गेल्यानंतर अनधिकृत इमारती बांधून त्याची वाढीव दराने विक्री करण्याच्या उद्देशाने सरपंच आणि ग्रामसेवकांच्या संगनमताने हा उद्योग केल्याचे दिसून आले आहे.

जागेवर इमारत अथवा बांधकाम नसतानाही निवासी आणि व्यावसायिक मिळकतींच्या ग्रामपंचायतीच्या ‘८ अ’च्या उताऱ्यावर नोंदी करण्यात आल्याचे चौकशीमध्ये लक्षात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी दिली.