पुणे : ‘बांधकाम तसेच रस्त्यांची कामे केल्यानंतर तयार होणाऱ्या राडारोड्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने धोरण तयार केले असून, त्याची नियमावली नव्याने तयार केली आहे. यामध्ये बांधकाम परवानगी दिल्यानंतर बांधकाम प्लिंथ तपासणीपर्यंत (जोते तपासणी) संबंधित विकासकाने राडारोडा कुठे टाकला, याचे स्पष्टीकरण घेतले जाणार आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले.
महापालिकेचा वाघोली येथे बांधकाम राडारोड्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे तयार झालेली खडी, दगड यांचा राडारोडा तेथेच टाकणे बंधनकारक आहे. बांधकाम व्यावसायिकांवर राडारोडा टाकण्याची जबाबदारी आहे. यासाठीची वाहतूक संबंधित विकासकानेच करणे आवश्यक आहे. त्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) संबधित प्रकल्पावरून घ्यावी लागणार आहे. यानंतरच जोते तपासणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
‘महापालिकेच्या बांधकाम विभागातील निरीक्षकांनी त्यांच्या भागातील बांधकामावरील राडारोडा कुठे टाकला गेला, याची माहिती ठेवणे. तसेच, संबधित व्यावसायिकाने सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकला, तर तेथील निरीक्षकाने थेट पोलीस तक्रार करून पुढील कारवाई शेवटपर्यंत न्यावी, असे आदेश देण्यात आले आहे. या नियमावलीनुसार लवकरच कार्यवाही सुरू होईल,’ असेही कौर यांनी सांगितले.
कौर म्हणाल्या, दगड, माती तसेच बांधकाम साहित्याचा राडारोडा कुठे टाकला जातो, याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यासाठी नवीन नियमावली प्रशासनाने तयार केली आहे. त्याची कडक अंमलबजाणी केली जाईल. यामुळे सर्रासपणे कुठेही राडारोडा टाकणाऱ्यांना आळा बसणार आहे. बांधकाम विकसकाबरोबरच महापालिकेच्या पथ, मलनिस्सारण, तसेच इतर विभागांकडून केल्या जाणाऱ्या कामांमधून राडारोडा तयार झाल्यास त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देखील संबंधित विभागाची आहे. यामध्ये टाळाटाळ झाल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.
दरम्यान, नदीपात्रात बेकायदा राडारोडा टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करून दहा लाखांचा दंड केला आहे. शिवाजीनगर तोफखाना येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून (एसआरए) हा राडारोडा आल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्यानंतर महापालिकेने संबधित विकासकाला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर अशाच पद्धतीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
शांतिवन परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकून नदीत सपाटीकरण केले आहे. घनकचरा विभागाने त्याला नोटीस दिली आहे. साधारण २० ट्रक माल आहे. ही कारवाई अधिक कडक करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

