पुणे : पुणे महापालिकेने विविध रुग्णालये आणि आरोग्य सुविधांचे संचालन सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविणे सुरू केल्याने काही सेवा महाग झाल्याचा आरोप होत आहे. ‘सेवांतील कारभार उत्तरदायी व पारदर्शक करणे हा कमतरतांवर उपाय असून, खासगीकरण-कंत्राटीकरण नव्हे,’ अशी भूमिका याबाबत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मांडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या एका रुग्णालयातील कार्डियाक कॅथ लॅब, ‘कार्डियाक आयसीयू’ आणि हृदय शस्त्रक्रिया सेवा ३० वर्षांसाठी खासगी संस्थेकडे दिल्या आहे. ही सेवा ‘सीजीएचएस’ अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या दरांपेक्षा पाच टक्के कमी दरात देण्याची अट आहे. महापालिकेच्या १८ प्रसूतिगृहांमधील पॅथॉलॉजी सेवादेखील पीपीपी तत्त्वावर देण्यात आल्या आहेत.

बऱ्याच ठिकाणी डायलिसिस सेवा खासगी संस्थांच्या माध्यमातून सुरू असून, सूत्रांनी सांगितले, की पीपीपी तत्त्वावर देण्यात आलेल्या डायलिसिस सेवांसाठी काही ठिकाणी प्रति रुग्ण ४०० रुपये, तर काही ठिकाणी ३५७ ते ३७८ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या सेवांमध्ये इतर साहित्याचा खर्च स्वतंत्र असल्याचे नमूद आहे. काही ठिकाणी महापालिकेने १५०० ते २००० चौरस फुटांपर्यंतची जागा भाडेमुक्त उपलब्ध करून दिली असून, सेवा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ खासगी भागीदाराने उपलब्ध करून देण्याची अट आहे.

‘तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्याचे कारण सांगून पुणे महापालिकेने अनेक रुग्णालये ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर खासगी कंपन्यांना चालवायला दिली आहेत. तज्ज्ञ डॉक्टर न मिळायला पुणे म्हणजे गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. खरे म्हणजे पुणे महापालिकेला रुग्णालये चालविण्याची इच्छा नाही. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्ट नगरसेवक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी खासगीकरणाद्वारे पालिकेच्या रुग्णालयांचा बाजार मांडला आहे,’ असा दावा आम आदमी पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे यांनी केला.

जनआरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके म्हणाले, ‘महापालिकेची रुग्णालये पीपीपी तत्त्वावर चालवायला देण्यातून महापालिकेचा आरोग्य सेवेवरील खर्च कमी करणे व भ्रष्टाचारातून सत्ताधारी पक्षांसंबंधी लोकांचे खिसे भरणे हे चालते. सेवेतील कमतरतांवर उपाय म्हणजे खासगीकरण नव्हे. त्यापेक्षा कारभार उत्तरदायी व पारदर्शक करणे गरजेचे आहे.’ ‘सार्वजनिक-खासगी भागीदारीतून जी रुग्णालये महापालिकेने उभी केली आहेत, ती वास्तविक व्यावसायिकच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जास्त दराने सेवा घ्याव्या लागतात. या रुग्णालयातील गुंतवणुकीवरील परतावा मिळवण्यासाठी रुग्णालयातील दर वाढीवच असतात,’ असे डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले.

प्रशासनाची भूमिका काय ?

महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने मात्र गरीब रुग्णांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळतात, असा दावा केला. ‘कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘पीपीपी’चा मार्ग स्वीकारला असला, तरी या सेवांचा प्रत्यक्ष लाभ गरीब रुग्णांना सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळतो का, याचे नियमित मूल्यमापन केले जाते,’ असे महापालिका आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पीपीपी’ तत्त्वावर देण्यात आलेल्या रुग्णालयाच्या सेवा त्या-त्या करारानुसार ठरविण्यात आल्या आहेत. काही कारारांत जागा देण्यात आली, काही ठिकाणी बांधकाम करून देण्यात आले आहे. प्रत्येकाच्या करारावर हे अवलंबून असून, यामध्ये एकसूत्रता असण्याचे कारण नाही. अशी माहिती महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली. ‘पीपीपी’ तत्त्वावर जी रुग्णालये चालवली जातात, त्यांच्या ज्या सुविधा आहेत, त्याचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे सूचना देण्यात येतात. हे काम नियमितपणे सुरू आहे. पुणे महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली.

प्लॅटिनम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पुरम यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय ‘पीपीपी’ तत्त्वावर चालविण्यासाठी महापालिकेने जागा आणि इमारत दिली. मात्र, मनुष्यबळ आणि सोयी सुविधांचा खर्च आमचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून परवडत नसल्याने ‘सीटी स्कॅन’ आणि ‘एमआरआय’सारख्या सुविधा बंद कराव्या लागल्या.

‘पीपीपी’वर चालणाऱ्या रुग्णालयांतील सरासरी दर (रुपयांत)

  • बाह्यरुग्ण विभाग तपासणी शुल्क : ३००
  • अतिदक्षता विभाग एका दिवसाचा खर्च : ३,५००
  • कोरोनरी ॲन्जिओग्राफी : ६५०० ते १०,०००
  • बायपास : दीड लाख