पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील विविध भागात असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय आणि चंदुमामा सोनवणे प्रसूतिगृहातील नवजात अतिदक्षता विभागांसाठी (एनआयसीयू) १० नवीन व्हेंटिलेटर आणि १० सीपीएपी मशीनची खरेदी करण्यात येणार आहेत. यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांची क्षमता वाढणार असून, त्याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. ही यंत्रसामग्री खरेदीसाठी ३ कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भिमाले म्हणाले, ‘महापालिका रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने गंभीर अवस्थेतील बालकांना अनेकदा ससून रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे पालक आणि नातेवाईकांची धावपळ होण्याबरोबरच महापालिका रुग्णालयांच्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली जाते.’

खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता महापालिका रुग्णालयांमध्येच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले होते. महापालिकेच्या अर्थसंकल्पात उपकरणे व यंत्रसामग्रीसाठीच्या १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून ३ कोटी ९८ लाख ५० हजार रुपये खर्च ही यंत्रसामग्री घेण्यासाठी केला जाणार आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहेत. खाजगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने गोरगरीब नागरिकांना कमी खर्चात महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार मिळतात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. सध्या महापालिका रुग्णालयांच्या एनआयसीयु मध्ये व्हेंटिलेटर ची संख्या कमी आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग उपचारासाठी आलेल्या रुग्णाला ससून हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगतात. यामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ससून मध्ये गेल्यानंतरही व्हेंटिलेटर मिळेल की नाही? याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेकदा खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णांना दाखल व्हावे लागते. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी होणारा खर्च हा मोठा असल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक ते उपचार मिळत नाही.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाचे व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव मान्यतेसाठी आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर रुग्णांच्या फायद्यासाठी याची खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले.